१०५ ग्रामपंचायतींना इमारती उपलब्ध नाही
By admin | Published: September 26, 2016 01:04 AM2016-09-26T01:04:25+5:302016-09-26T01:04:25+5:30
जिल्हा परिषद : दोन वर्षांत एकही रूपया मिळाला नाही; १२ कोटी ६० लाखांची गरज
कोल्हापूर : जिल्ह्णातील १०५ ग्रामपंचायतींना सद्य:स्थितीत इमारती नसल्याचे चित्र असून यासाठी १२ कोटी ६० लाख रुपयांची आवश्यक्ता आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये इमारती बांधण्यासाठी एकही रुपया मिळाला नाही. गडहिंग्लज तालुक्यात सर्वच्या सर्व म्हणजे ८९ ग्रामपंचायतींना इमारती असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्णात १०३० ग्रामपंचायती आहेत. त्यातील ९२५ ग्रामपंचायतींना इमारती उपलब्ध आहेत. मात्र, १०५ ग्रामपंचायतींना इमारती उपलब्ध नाहीत. जुन्या झालेल्या इमारतीत अथवा भाड्याच्या जागेत अशा या ग्रामपंचायती कार्यरत आहेत. वास्तविक केंद्र आणि राजय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी आता गावपातळीवर पाठविला जात आहे. ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही अनेक ग्रामपंचायतींना इमारती नाहीत हे वास्तव आहे.
या १०५ ग्रामपंचायतींना इमारती बांधावयाच्या झाल्या तर प्रत्येक इमारतीला १२ लाख रुपये याप्रमाणात कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी १२ कोटी ६० लाख रुपयांची गरज आहे.
दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य प्रकल्प संचालकांनी राज्यभरातून किती ग्रामपंचायतींना इमारती नाहीत याची आकडेवारी मागवली होती.
अनेक ठिकाणी छोट्या ग्रामपंचायतींच्या इमारती बांधताना कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नव्या इमारतीही चार-पाच वर्षांत जीर्ण झाल्याचीही उदाहरणे घडली आहेत. अशाही गावांचे पदाधिकारी नव्या कार्यालयांसाठी आग्रही असल्याचे चित्र दिसून येते.
मात्र, ठरावीक वर्षे झाल्याशिवाय अशा इमारतींसाठी पुन्हा नव्याने निधी देता येत नसल्याने काही ठिकाणी नव्या इमारतीही आता जुनाट झाल्याचे दिसून येते.
तालुका व इमारतींची गरज
भुदरगड- ७, राधानगरी- १०, गगनबावडा- १२, कागल-९, हातकणंगले -१,शिरोळ-२, शाहूवाडी-११, करवीर-१४,
आजरा- ९, चंदगड-२५, पन्हाळा -५