हॉलमार्किंग युनिक आयडीविरोधात आज सराफ व्यापार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:39+5:302021-08-23T04:25:39+5:30
कोल्हापूर : सराफ व्यापाऱ्यांकडून हॉलमार्किंगचे स्वागत होत आहे. मात्र, हॉलमार्किंग युनिक आयडी ही एक विध्वंसक प्रक्रिया आहे. सध्याची ...
कोल्हापूर : सराफ व्यापाऱ्यांकडून हॉलमार्किंगचे स्वागत होत आहे. मात्र, हॉलमार्किंग युनिक आयडी ही एक विध्वंसक प्रक्रिया आहे. सध्याची अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रिया दागिन्यांची कोणतीही सुरक्षा देत नाही. त्यामुळे ग्राहक आणि एमएसएमई ज्वेलर्सना त्रास होणार आहे. त्यामुळे त्याला सराफ व्यावसायिकांचा विरोध आहे. आज (सोमवारी) कोल्हापुरातील सराफ व्यापार बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी रविवारी दिली.
कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे जिल्ह्यातील २,५०० सभासद हे आपली दुकाने, पेढी बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. हॉलमार्किंग युनिक आयडीची अंमलबजावणी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सोमवारी दुपारी १२ वाजता सराफ संघाच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. बीआयएस कायदा तयार करताना हॉलमार्किंगवरील नीती आयोगाच्या अहवालाला बेंचमार्क मागण्याची ज्वेलरी उद्योगाची मागणी असूनही विचारात घेतली गेली नाही. त्याचा विरोध करण्यासाठी होत असलेल्या देशव्यापी बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यापारीही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.