बैलगाडी कालव्यात पडून बैलांचा मृत्यू, कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवे खुर्द येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 05:13 PM2023-04-19T17:13:20+5:302023-04-19T17:13:46+5:30
लोकांनी बैलांना वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र बैलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला
रमेश वारके
बोरवडे : शेतातील कामे आटोपून परताना अचानक बैल घाबरल्याने बैलगाडी शेतकऱ्यासह कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत दोन बैलांचा मृत्यू झाला. वाळवे खुर्द (ता. कागल) येथे आज, बुधवार (दि.१९) सकाळच्या सुमारास घडली ही घटना घडली. यात शेतकरी खुटाळे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, शेतकरी दिलीप खुटाळे हे सकाळी खाणीचे शेत नावाच्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. काम आटोपून बैलगाडीने ते कालव्याच्या काठावरील रस्त्याने घरी निघाले होते. अचानकपणे बैल घाबरल्याने कालव्यात पडले. गळ्यामध्ये बैलगाड्याचे सापती असल्यामुळे बैलांना पोहून बाहेर येता आले नाही. मात्र शेतकरी कसाबसा बचावला.
त्यांनी आरडाओरडा करुन लोकांना गोळा केले. लोकांनी बैलांना वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र बैलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती गावात कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. बैलांचे मृतदेह पाहून हळहळ व्यक्त होत होती. गरीब शेतकऱ्याच्या दोन बैलांचा अचानक मृत्यू झाल्याने शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.