वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वनक्षेत्रपालांनी वर्तवली शक्यता, किटवडेत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:34 PM2021-12-20T19:34:02+5:302021-12-20T19:37:18+5:30

या परिसरात वाघाचे वास्तव्य नाही. मात्र चंदगड किंवा आंबोली भागातून आलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला असण्याची प्रथमदर्शनी शक्यता वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांनी वर्तवली आहे.

Bullocks killed in tiger attack, fear in Kitwade area Ajara taluka | वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वनक्षेत्रपालांनी वर्तवली शक्यता, किटवडेत भीतीचे वातावरण

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वनक्षेत्रपालांनी वर्तवली शक्यता, किटवडेत भीतीचे वातावरण

Next

आजरा : वाघाने केलेल्या हल्ल्यात किटवडे (ता. आजरा)  येथील दत्तात्रय झेलू चव्हाण या शेतकऱ्याचा बैल ठार झाला आहे. मंगळवारपासून बेपत्ता असलेला बैल आज कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी वाघाच्या कोणत्याही पाउलखुणा मिळत नाहीत मात्र बैलाची शिकार वाघाने केली असण्याची प्रथमदर्शनी शक्यता असल्याचे वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांनी वर्तवली आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे किटवडे परिसरात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.

किटवडे येथील दत्तात्रय झेंडू चव्हाण यांनी आपली जनावरे आपल्या मालकीच्या क्षेत्रात चारण्यासाठी सोडली होती. मात्र त्यामधील एक बैल गेल्या मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याची शोधाशोध सुरू होती. आज दुपारी सदरचा बैल जंगल क्षेत्रातील कक्ष क्र. १८४ मध्ये कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

याची माहिती मिळताच वनपाल सुरेश गुरव व वनरक्षक राहुल कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतावस्थेतील बैलाच्या माने जवळील व पाठीमागील भाग घटनास्थळी दिसत नाही. सदरचा बैल कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य नाही. मात्र चंदगड किंवा आंबोली भागातून आलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला असण्याची प्रथमदर्शनी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांनी सांगितले. या घटनेने मात्र किटवडे, धनगरवाडा, आंबाडे, घाटकरवाडी परिसरात भितीयुक्त वातावरण पसरले आहे.

जिल्हा उपवनसंरक्षक घटनास्थळाला भेट देणार

आजरा तालुक्यात हत्ती व गवारेड्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने किटवडे येथील घटनास्थळाला जिल्हा उपवन संरक्षक आर. आर. काळे उद्या, मंगळवार (दि २१) भेट देणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

Web Title: Bullocks killed in tiger attack, fear in Kitwade area Ajara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.