‘भोगावती’चा दणका; ‘पी. एन.’ यांचा एक्का!
By admin | Published: April 25, 2017 01:13 AM2017-04-25T01:13:12+5:302017-04-25T01:13:12+5:30
महाआघाडीचा सुपडासाफ : काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय
कोल्हापूर/भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ने सर्वच्या सर्व २१ जागा सरासरी चार हजारांच्या फरकाने जिंकून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे घेतल्या. सडोली खालसा गटातून पी. एन. पाटील हे तब्बल ५३८१ इतके मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले. ‘राष्ट्रवादी-शेकाप-शिवसेना-भाजप-स्वाभिमानी’ प्रणित दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला. कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांच्या नेतृत्वाखाली ‘परिवर्तन’चा ‘पतंग’ हवेतच राहिला. कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, अशोक पवार, बाबूराव हजारे, नंदूभाऊंना मतदारांनी अक्षरश: झिडकारले.
कारखान्याच्या २१ जागांसाठी रविवारी ७८ टक्के मतदान झाले होते. एकूण ३० हजार ५१८ पैकी २४ हजार १६४ मतदारांनी हक्क बजावला. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरुवात झाली. पन्नास टेबलांवर दुपारी दोनपर्यंत एकत्रिकरण करण्यात आले. दुपारी तीननंतर प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात झाली. सव्वाचार वाजता संस्था गटातील निकाल अधिकृत जाहीर करण्यात आला. साडेसहाशे मतांची फेरी अशा ३८ फेऱ्या करण्यात आल्या. पहिल्या फेरीपासूनच ‘काँग्रेस’आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. दहा हजार मतांची मोजणी झाल्यानंतर ‘काँग्रेस’ आघाडीचे नेते पी. एन. पाटील यांना तब्बल ६१५१ मते मिळाली होती. या आघाडीचे सर्व उमेदवार महाआघाडीपेक्षा सरासरी १३०० मतांनी पुढे होते.‘परिवर्तन’आघाडीचे उमेदवार नऊशे मतांच्या आतच राहिले. रात्री आठ वाजता ‘कौलव’, ‘कसबा तारळे’, राशिवडे’ व सडोली खालसा या गटातील वीस हजार मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यामध्ये ‘काँग्रेस’ आघाडीचे सर्व उमेदवार तीन ते चार हजारांच्या फरकाने आघाडीवर होते. रात्री साडेआठ वाजता सडोली खालसा गटाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये ‘काँग्रेस’आघाडीचे पी. एन. पाटील हे १३४३१ तर दत्तात्रय मेडशिंगे १२६४९ मते घेऊन विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एम. माळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे, संभाजी पाटील यांनी काम पाहिले.
दोन्ही पॅनेलहून जास्त मताधिक्य
संस्था गटातील उमेदवारास चरापले यांनी शेवटच्या दिवशी मदत केली. त्यामुळे महाआघाडीची ही जागा तरी निवडून येणारच परंतू चरापले पॅनेल जेवढी जास्त मते घेईल त्याचा फायदा महाआघाडीस होईल आणि आमचे पॅनेल निवडून येणार असा छातीठोक दावा महाआघाडीचे नेते करत होते. परंतू तो सभासदांनी चुकीचा ठरविला. धैर्यशील पाटील व चरापले पॅनेलच्या एकत्रित मतांहून जास्त मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळाली.
अन् कौलवकरांनी मतमोजणी केंद्र सोडले
‘महाआघाडी’चे नेते धैर्यशील पाटील-कौलवकर हे सकाळी आठपासून मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते. एकत्रिकरणापासूनच निकालाचा कल लक्षात येत होता. मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर मताधिक्य वाढत गेल्यानंतर त्यांनी साडेपाच वाजता मतमोजणी केंद्र सोडले.
संस्था गटातून काँग्रेसची विजयी सलामी
संस्था गटात ४६० मतदान असल्याने चुरस पाहावयास मिळाली. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला रोखण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला तरीही ‘काँग्रेस’आघाडीचे प्रा. शिवाजीराव पाटील यांनी प्रतिस्पर्धी ‘महाआघाडी’चे महेश बाजीराव वरूटे यांच्यावर तब्बल १०४ मताधिक्य घेत विजयी सलामी दिली.
अन् गाड्यांच्या पुंगळ्या निघाल्या
सायंकाळ पाच नंतर निकालाचा कल लक्षात आल्याने ‘पी. एन.’ समर्थकांनी कोल्हापूरची वाट धरली. सडोली खालसा गटातील निकाल लागल्यानंतर समर्थकांनी पुंगळ्या काढल्या आणि जल्लोष सुरू केला.