शिष्यवृत्ती परीक्षेत बोरगावमध्ये गोंधळ
By admin | Published: March 23, 2015 12:48 AM2015-03-23T00:48:13+5:302015-03-23T00:50:51+5:30
चुकीची उत्तरपत्रिका : पालकांचा संताप; केंद्रप्रमुख, निरीक्षकांवर कारवाईची मागणी
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला. उत्तरपत्रिका हाती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार करूनही केंद्रसंचालक व निरीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, दिलेली उत्तरपत्रिकाच सोडविण्यास सांगितली. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडेही तक्रार केली. त्यांनी संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची ग्वाही दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.बोरगाव येथील हिंदमाता केंद्रावर रविवारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २१६ विद्यार्थी या केंद्रावर परीक्षेसाठी होते. बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असल्याने कलरकोड, बारकोडनुसार प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे नियोजन करण्यात येते. रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होता. यावेळी केंद्रप्रमुख व निरीक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठीची लाल रंगाची प्रश्नपत्रिका व दुपारी ३ वाजता असलेल्या बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेची हिरव्या रंगाची उत्तरपत्रिका दिली. हा प्रकार लक्षात आल्यावर काही विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेवर विषयांचा उल्लेखही होता.
बुद्धिमत्तेचे गुण मराठीला, मराठीचे गुण बुद्धिमत्तेला
या परीक्षेवेळी देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेतील विसंगतीमुळे विद्यार्थीच नव्हे, तर पालकही संभ्रमात आहेत.
बहुपर्यायी पद्धतीनुसार परीक्षा
असल्याने लाल रंगाच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेची हिरव्या रंगाच्या बुध्दिमत्ता विषयाच्या उत्तरपत्रिकेत नोंदविलेली उत्तरे चुकीची ठरणार आहेत.
हाच प्रकार बुद्धिमत्ता विषयाच्या बाबतीतही होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन चुकीचे ठरणार आहे.
मराठी विषयाला बुद्धिमत्ता विषयाचे, तर बुद्धिमत्ता विषयाला मराठी विषयाचे गुण मिळणार आहेत. त्यामुळे अजूनही याबाबतची संभ्रमावस्था दूर झाली नाही.