मोळी टाकली... कोयते अद्याप थंडच
By admin | Published: October 25, 2015 12:50 AM2015-10-25T00:50:06+5:302015-10-25T01:09:07+5:30
साखर हंगामाची कोंडी : ‘दालमिया’ सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मुहूर्तावर ऊसमोळीचे पूजन केले; पण अद्याप कारखान्यांची चाके मात्र स्थिरच आहेत. ‘एकरकमी एफआरपी’च्या मुद्द्यामुळे यंदाच्या हंगामात तिढा निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७ नोव्हेंबरच्या ऊस परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यानंतरच हंगाम सुरू करण्याबाबत कारखानदारांमध्ये चर्चा होऊ शकते.
गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम संपले होते. यंदा दुष्काळाचा फटका ऊस पिकाला बसला आहे. डिसेंबरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. यासाठी गळीत हंगाम लवकर सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण साखर कारखानदारांची सावध भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद पाहता हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता फारच धूसर आहे.
आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील ‘दालमिया’ या खासगी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे. ‘दालमिया’ने कागल, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, आदी ठिकाणी ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा इतर कारखान्यांकडे लागल्या आहेत.
रिकव्हरीसाठी मखलाशी
एकरकमी ‘एफआरपी’चा मुद्दा पुढे करीत साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ‘एफआरपी’साठी पैशांची उपलब्धता हा मुद्दा जरी खरा असला, तरी आॅक्टोबर महिन्यात कारखाने सुरू केल्यास ‘रिकव्हरी’ला फटका बसणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम सुरू करण्याची मखलाशी आहे.
ऊस परिषदेला उशिरा का?
खासदार राजू शेट्टी यांनी आॅक्टोबरमध्ये ऊस परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणे अपेक्षित आहे; पण मुळात नोव्हेंबर महिन्यात ऊस परिषद घ्यायची; त्यानंतर कारखानदारांशी चर्चा सुरू म्हणजे उसावर कोयता पडायला डिसेंबर उजाडतो.