खासगी क्लास घेणार्यांना दणका
By admin | Published: June 5, 2014 01:20 AM2014-06-05T01:20:30+5:302014-06-05T01:27:24+5:30
शिक्षण उपसंचालक : ‘त्या’ शिक्षकांवर तात्काळ कारवाईचे आदेश
कोल्हापूर : शाळा, महाविद्यालयांत कार्यरत असतानाही खासगी क्लासेस चालविणार्या शिक्षकांवर कारवाई करा, असे आदेश शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी शिक्षणाधिकार्यांना दिले आहेत. ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रायव्हेट टिचर्स असोसिएशन’ने दिलेल्या निवेदनाची दखल घेत ही कार्यवाही केली आहे. शिक्षकांना शासनाकडून चांगले वेतन मिळत असतानाही अनेक जण जादा कमाईसाठी खासगी शिकवणी घेतात. तसेच आपल्याच शाळेतील विद्यार्थांना या खासगी शिकवणीला प्रवेश घेण्यासाठी दबाव टाकतात. अशी अनेक उदाहरणे व तक्रारी गेल्या कांही वर्षापासून शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र याबाबत कधीच कडक कारवाई करण्यात आली नव्हती. किंबहूना कांहीनी कारवाई करण्याकडे याकडे डोळेझाकच केली होती. आता मात्र शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) सेवेत असताना खासगी क्लासेस घेणार्या शिक्षकांवर कारवाईची तरतूद आहे. त्याचा आधार घेत ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रायव्हेट टिचर्स असोसिएशन’ने अशा पद्धतीने क्लासेस घेणार्या शिक्षकांवर कारवाईची मागणी शिक्षण उपसंचालकांकडे केली. त्याबाबतचे निवेदन देखील असोसिएशनने दिले आहे. त्याच्या आधारे शिक्षण उपसंचालक गोसावी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकांर्याना कारवाईचे आदेश दिले आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना कारवाईचे आदेश झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत असोसिएशनचे उपाध्यक्ष बी. एस. पाटील, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देसाई, सचिव प्रा. संजय वराळे, मोहन गावडे, प्रशांत कासार, दीपक खोत, अस्मिता जोशी, तानाजी चव्हाण, आदींनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठपुरावा केला. (प्रतिनिधी)