नेत्यांच्या निवडणुकीचे कोल्हापूर ‘गोकुळ’वर ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:53 PM2017-11-30T21:53:49+5:302017-11-30T21:56:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो, यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो, यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले. संघाच्या सुपरवायझरना गावोगावची निवडणुकीत उपयोगी पडू शकेल अशी राजकीय माहिती संकलित करण्याचे काम दिले आहे. त्यासाठी चक्क सहा पानांचा फॉर्मच दिला आहे. हा एक फॉर्म भरतानाही चांगलाच घाम फुटेल, इतकी माहिती त्यात विचारली आहे.
संघाचे नेते समजले जाणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल हा भाजपचा आमदार आहे. पुतणे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माजी आमदार पी. एन. पाटील हे करवीर मतदारसंघातील काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे पुतणे चंद्रदीप नरके शिवसेनेचे आमदार आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई तसेच संजयबाबा घाटगे हे विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत; परंतु साºया जिल्'ातून इतकी तपशीलवार माहिती गोळा करण्यामागे खासदार महाडिक यांची लोकसभेची निवडणूक असण्याची शक्यता जास्त आहे.
अन्य इच्छुक इतक्या पद्धतशीरपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आजवरचा अनुभव नाही. ‘गोकुळ’ने ही माहिती ‘एनडीडीबी’ला हवी आहे, असे कारण पुढे केले आहे. गेल्या शनिवार (दि. २५) पासून ती गोळा केली जात आहे. त्यामुळे ही माहिती नक्की कशासाठी संकलित केली जात आहे, हे जाहीर करण्याची जबाबदारी आता संघाच्या नेतृत्वाची व व्यवस्थापनाची आहे.
दूध संघाच्या कामासाठी ही माहिती हवी असती तर ती फक्त दूध संस्थांपुरतीच मर्यादित राहिली असती; परंतु तसे घडलेले नाही. या माहितीमध्ये गावाचे नाव, ग्रामदैवत, यात्रा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेचा मतदार संघ कोणता हे विचारण्यात आले आहे. त्याशिवाय सत्तास्थानेमध्ये सेवा सोसायट्या, पाणीपुरवठा संस्था, दूधसंस्था, पतसंस्था, शिक्षणसंस्था व त्यांच्या प्रमुख पदाधिकाºयांचे संपर्क नंबर संकलित करण्याच्या सूचना आहेत. गावांतील सहकारी बँकांतील आजी-माजी पदाधिकाºयांची आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. त्या गावांतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शेकाप, जनसुराज्य, जनता दल, रामदास आठवले गट, प्रा. जोगेंद्र कवाडे गट, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, बसप आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांची नावेही संकलित केली जाणार आहेत. त्याशिवाय संबंधित गावाच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत त्या लिहिण्यासाठी तब्बल एक पानच दिले आहे. एवढी सविस्तर माहिती ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’सारखी नामांकित संस्थाही कधी गोळा करीत नाही. या माहितीची दूध संघाला गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरासरी १० गावे
संघाकडे सध्या सुमारे १७५ सुपरवायझर आहेत. त्यांना प्रत्येकी ९ ते १० गावांची ही माहिती गोळा करावी लागणार आहे. पदाधिकाºयांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक गोळा करताना तोंडाला चांगलाच फेस येत असल्याची प्रतिक्रिया एका सुपरवायझरने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
निवडणूक निधीही!
मध्यंतरी राधानगरी तालुक्यातील एका संचालकाने मी तुम्हांला नोकरी लावले म्हणून कर्मचाºयांच्या बोनसमधून काही रक्कम विधानसभेच्या निवडणुकीसाठीच कपात करून घेतली होती.
व्यवस्थापनाचा संपर्क नाही
दरम्यान, या माहितीबाबत संघाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.