‘पुनर्वसन’चा भोंगळ कारभार
By admin | Published: March 4, 2016 09:35 PM2016-03-04T21:35:00+5:302016-03-04T21:35:00+5:30
दोडामार्गातील प्रकार : आडनाव बदलून मोबदला डावलण्याची घटना
साटेली-भेडशी : तिलारी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंटची रक्कम देण्यासाठी सिंधुदुर्ग पुनर्वसन शाखेच्यावतीने दाखल्याची पडताळणी सुरू आहे. यामध्ये साटेली- भेडशी येथील संदेश चंद्रकांत पास्ते (रा. साटेली-भेडशी) या दाखला धारकाला नोटीस बजावत असताना त्याचे वडील नोकरीला लागले असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘पास्ते’ आडनाव नामक दाखलाधारकाचे वडील ‘नाईक’ करण्याची किमया पुनर्वसन शाखेने करून दाखविली. याबाबत जोरदार चर्चा सुरू असून पुनर्वसन विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
गेल्या तीस वर्षापासून तिलारी धरणग्रस्त आपल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी झगडत आहेत. तिलारी धरण साकारावे, यासाठी एका नोकरीचे आमिष तत्कालीन सरकारने दाखविले होते. मोठ्या मनाने पिढीजात संपत्तीचा त्याग करत पाल, पाटये, आयनोडे, सरमळे, शिरंगे आदी गावांचे झरेबांबर, साटेली, बोडदे, सासोली आदी ठिकाणच्या माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. तीस वर्षे झाली तरी संघर्ष न संपलेल्या धरणग्रस्तांतून काही वर्षापासून धरणग्रस्त संघर्षग्रस्त समिती स्थापन करून घरटी एक नोकरीऐवजी वनटाईम सेटलमेंटसाठी संघर्ष सुरू झाला.
याचेच फलित म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने नोकरीऐवजी एकरकमी पाच लाख अनुदान देण्याचे ठरविले. सत्तेवर आलेल्या सेना भाजप युती सरकारने याबाबतचा अध्यादेशही जारी केला. त्यानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न सुटला असे वाटत असताना पुनर्वसन शाखेने आपणच दिलेल्या ९४७ दाखल्यांवर संशयाचे बोट ठेवले. त्यामुळे पुनर्पडताळणीत हा प्रश्न अडकला. ही पडताळणी करताना जिल्हा पुनर्वसन शाखेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. यामध्ये दाखलाधारक संदेश चंद्रकांत पास्ते याला नोटीस बजावताना त्यांचे वडील नोकरीला लागल्याचे म्हटले आहे. मात्र भलत्याचे नाव नोंदविल्याने पास्ते कुटुंबीयांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. संदेश पास्ते याला पत्र देताना त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद अर्जुन नाईक असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पास्ते आणि नाईक असा वेगळा शोध पुनर्वसन खात्याने लावला आहे. या प्रकरणाने पास्ते कुटुंबीयांना पुनर्वसन खात्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)
पत्रामुळे मानसिक त्रास : संदेश पास्ते
संदेश चंद्रकांत पास्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांना प्रकल्पग्रस्त दाखल्याद्वारे नोकरीमध्ये सामावून घेतलेले नाही. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन खात्याने पत्रात नमूद केलेल्या गोविंद अर्जुन नाईक यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. या पत्रामुळे माझ्यासह कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.