शालेय दप्तराचे ओझे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:27 AM2018-11-29T00:27:21+5:302018-11-29T00:27:27+5:30

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी अथवा दोन विषयांसाठी एक वही, ई-लर्निंगच्या माध्यमातून ...

The burden of school drop-outs | शालेय दप्तराचे ओझे कमी

शालेय दप्तराचे ओझे कमी

Next

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी अथवा दोन विषयांसाठी एक वही, ई-लर्निंगच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील १८० शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे. गेल्या सात वर्षांपासून शाळांनी या विविध संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जाऊ नये. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असू नये, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कोल्हापूर शहरातील याबाबतची स्थिती जाणून घेतली. दप्तराचे वाढते ओझे ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनांनुसार शहरातील शाळांनी विविध संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. विद्यापीठ मराठी शाखा शाळेने वेळापत्रकात बदल, दोन विषयांसाठी एक वही, वर्ग कोपरा आणि ई-लर्निंगच्या माध्यमातून दप्तराचे ओझे घटविले आहे. दर शनिवारी ‘विनादप्तर शाळा’ भरविण्यात येते. त्या दिवशी ज्ञानरचनावादी शिक्षण दिले जाते. शाळेने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे वजन दहा टक्के ठेवले आहे. कदमवाडी येथील महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिरात गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षातील पुस्तके जमा करून घेऊन ती वर्ग अभ्यासासाठी बेंचीसमध्ये कायमस्वरूपी वर्गातच ठेवण्यात आली आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील नवीन पुस्तके घरी अभ्यासासाठी वापरण्यास दिली आहेत. त्यामुळे ५० टक्के ओझे कमी झाले आहे.
शाहूपुरीतील वसंतराव चौगुले विद्यालयात सर्व विषयांसाठी एकच वही वापरण्याची संकल्पना राबविली जाते. या शाळांची ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. शहरातील महानगरपालिका, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा १८० शाळांनी दप्तराचे ओझे कमी केले आहे.

Web Title: The burden of school drop-outs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.