वृक्षतोडीवर उगारला कारवाईचा बडगा
By Admin | Published: April 16, 2015 11:14 PM2015-04-16T23:14:51+5:302015-04-17T00:02:56+5:30
वनविभागाला खडबडून जाग : तोडलेल्या झाडांच्या बुंध्यावर केल्या खुणा--लोकमतचा दणका
ढेबेवाडी : बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीमुळे वन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला गेल्याने ढेबेवाडी विभागातील व्यापाऱ्यांना याचा चांगलाच चाप बसला आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या कारवाईमुळे होणारी वृक्षतोडही थांबण्यास मदत होणार आहे. बेकायदा वृक्षतोड आणि ढेबेवाडी वन विभागाच्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने बेकायदेशा वृक्षतोड करत असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. कटरच्या साह्याने कापलेल्या झाडांच्या बुंध्यावर कारवाईचे ठपके मारून कामात तरबेज असल्याचा उसना आव येथील वन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आणला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या ढेबेवाडी विभागातील वनविभागाच्या डोंगरपठारासह शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या असलेल्या वृक्षांची बेसुमार वृक्षतोड सुरू होती. वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून कधीतरी होणारी वृक्षतोड आता नित्याचीच बाब बनली आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी तेथील व्यापाऱ्यांवर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीचे कारण म्हणजे, मोठ्या प्रमाणात वाढलेली व्यापाऱ्यांची संख्या, अपुरे वनकर्मचारी आणि संख्याबळ आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. लाकूड व्यापारी आणि वनविभागाच्या दृढ संबंधांबाबत दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने आपल्या बातमीतून आवाज उठविला, तसेच केलेल्या वृक्षतोडीचे छायाचित्रही प्रसिद्ध केले. त्याचा आधार घेत वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या वृक्षांच्या बुंध्यावर ठपके मारले, तसेच संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे ढेबेवाडी परिसरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी वनविभागाला बेकायदा वृक्षतोडीचे चित्र बदलण्यात यश येईल का? अशी चर्चा येथील नागरिकांमधून केली जात आहे. कापलेल्या झाडांच्या बुंध्यावर वनविभागाने कारवाईचे ठपके मारून कायद्याची दहशत दाखवली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाई करताना वनविभाग व्यापाऱ्यांनाच गुन्हेगार ठरविणार की संबंधित शेतकरी, वृक्षतोड करणारा कटरवाला यांनाही सामोरे जावे लागणार, याकडे लक्ष आहे. (वार्ताहर)