परीक्षा विभागावर दोन लाख विद्यार्थ्यांचा भार
By Admin | Published: August 10, 2016 12:40 AM2016-08-10T00:40:24+5:302016-08-10T01:09:58+5:30
शिवाजी विद्यापीठ : यंत्रणा उभारण्यास कमी अवधी; संगणक प्रणाली सुधारावी लागणार
कोल्हापूर : अतिरिक्त सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार पेलण्याचे आव्हान आता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर उभारले आहे. ‘एमकेसीएल’ने विद्यापीठासमवेत काम करणे थांबविल्यामुळे परीक्षा विभागावर संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी पडली आहे.
दरवर्षी विद्यापीठाकडून विविध १२२ अभ्यासक्रमांच्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यांतील अभियांत्रिकी, विधि (लॉ), विज्ञान, आदींसह काही कमी कालावधीच्या शंभर अभ्यासक्रमांच्या दीड लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेण्यात येत होत्या. यासाठी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीचा वापर केला जात होता. उर्वरित बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए, बीसीए, आदी विविध २२ अभ्यासक्रमांच्या तृतीय वर्षांतील दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘एमकेसीएल’च्या संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. मात्र, ३१ जुलैपासून ‘एमकेसीएल’ने विद्यापीठासमवेत काम करणे थांबविले आहे. त्यामुळे संबंधित दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आव्हान पेलण्यासाठी विद्यापीठाला संगणक प्रणालीपासून माहिती व तंत्रज्ञानाचा अद्ययावत कक्ष कार्यान्वित करण्याची यंत्रणा उभारावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा आॅक्टोबरपासून सुरू होतात. त्यामुळे संबंधित परीक्षा घेण्याची यंत्रणा विद्यापीठाला कमी कालावधीत उभारावी लागणार आहे. एमकेसीएल आणि विद्यापीठ एकत्रितपणे परीक्षा घेऊनही काही वेळा प्रवेशपत्र न मिळणे, चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण होणे, आदी स्वरूपातील प्रकार घडले आहेत.
हे प्रकार टाळण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला काम करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनासह विविध घटकांनी परीक्षा विभागाला आवश्यक त्या स्वरूपातील मदतीचा हात देणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाला हे करावे लागणार
परीक्षा विभागाला सक्षम करण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. त्यात सध्याची संगणक प्रणालीतील त्रुटींची पूर्तता करून ती अधिक सक्षम करणे; प्रश्नपत्रिकांचे आॅनलाईन वितरण, आदी कामकाजासाठी अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कक्षाची उभारणी करणे. आयटीच्या कामकाजात प्रशिक्षित कर्मचारी देणे तसेच यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे.
‘एमकेसीएल’ने विद्यापीठासमवेत काम करणे थांबविल्यामुळे अचानकपणे संबंधित दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार विद्यापीठावर पडला आहे. तो पेलण्यासाठी विद्यापीठ सज्ज झाले आहे. त्यानुसार परीक्षा विभागाकडून याबाबतचा कृती आराखडा तयार केला जात आहे. सध्या ‘एमकेसीएल’कडून विद्यार्थ्यांची माहिती बिनचूकपणे मिळविण्याचे महत्त्वाचे काम आहे.
- महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ