राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त
By तानाजी पोवार | Published: September 24, 2022 09:48 PM2022-09-24T21:48:55+5:302022-09-24T21:49:50+5:30
घरफोडीतील पावणेतेरा ग्रॅम सोन्याचे दागिने व २० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
तानाजी पोवार, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरफोडीतील दागिने विक्रीसाठी आलेल्या राक्षी (ता. पन्हाळा) येथील तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर वाघबीळ चौकात अटक केली. विशाल केरबा साळवी (वय २६) असे अटक केलेल्या संशयित घरफोड्याचे नाव आहे. त्याने चार दिवसांपूर्वी राक्षी येथे घरफोडी केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून घरफोडीतील पावणेतेरा ग्रॅम सोन्याचे दागिने व २० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून गोपनीय व तांत्रिकरित्या माहिती काढून पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. त्यावेळी पथकाला एक घरफोड्या पन्हाळा मार्गावर वाघबीळ घाटात गुन्ह्यातील दागिने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयावरून विशाल साळवी याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने राक्षी येथे चार दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यातील सोन्याचा नेकलेस, लहान मुलाच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, चांदीचे दागिने असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याला मुद्देमालासह पुढील तपासासाठी पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेताजी डोंगरे, अंमलदार श्रीकांत मोहिते, विलास किरोळकर, रणजित कांबळे, दीपक घोरपडे, वैभव पाटील आदींनी केली.