गोव्यातून येऊन कोल्हापुरात रात्रीत करायचे घरफोड्या, दोघांना अटक; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:16 PM2022-09-29T12:16:11+5:302022-09-29T12:18:11+5:30
चोरटे हे मूळचे राजस्थानचे असले तरीही त्यांचे सध्या गोव्यात वास्तव्य होते. चोऱ्या करून पुन्हा गोव्याला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कोल्हापूर : चारचाकी वाहनातून गोव्यातून रात्रीच्यावेळी कोल्हापुरात येऊन चोऱ्या करून पुन्हा तातडीने गोव्याला जाणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.
त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तीन चारचाकी वाहने व घरफोडीतील साहित्य असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ईश्वरसिंग रणवीरसिंह राजपूत (वय ३०, रा. मार्देम, नॉर्थ गोवा. मूळ गाव- जुनी बाली, ता. बागोडा, जि. जालोर, राजस्थान) , कृष्णकुमार राणाराम देवासी (२७ रा. करासवाडा, म्हापसा गोवा, मूळ गाव- हरटवाव, जि. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली चारचाकी वाहन हे दोघेजण घेऊन कोल्हापूर ते कागल प्रवास करून कणेरी फाट्याजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मार्गावर सापळा रचून चारचाकी वाहन पकडले. त्यांच्यातील दोघांना अटक केली.
चोरटे हे मूळचे राजस्थानचे असले तरीही त्यांचे सध्या गोव्यात वास्तव्य होते. ते आपल्या मालकीच्या चारचाकी वाहनातून गोव्यातून रात्रीच्यावेळी कोल्हापुरात येत होते. चोऱ्या करून पुन्हा गोव्याला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. किरण भोसले, अंमलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार, अनिल जाधव यांनी केली.
कागल, आजरा, गांधीनगर, करवीर हद्दीतील चोऱ्या उघड
दोघांनी अन्य साथीदारांसह आजरा, गांधीनगर, करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चारचाकी वाहने व इको वाहने चोरी केल्याचे उघड झाले. त्यांनी गुन्हे करण्यासाठी इको वाहनाचाही वापर केल्याचे निष्पन्न झाले. ही तीन वाहने व घरफोडीतील साहित्य असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.