Kolhapur-पोलिसांचा अजब कारभार; गुन्हा दाखल घरफोडीचा; तपास केला दुचाकी चोरीचा
By उद्धव गोडसे | Published: July 5, 2023 11:43 AM2023-07-05T11:43:15+5:302023-07-05T11:44:29+5:30
चोरटे सापडत नसल्याचे सूचना पत्र फिर्यादींना पाठवले
उद्धव गोडसे
कोल्हापूर : राजारामपुरीतील मंडलिक पार्क येथील घरफोडीचा गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन महिने उलटत आले तरी राजारामपुरी पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत. १४ लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी मात्र दुचाकी चोरीचा तपास केला. चोरटे मिळाल्यास किंवा गुन्ह्याचा तपास पुढे चालू केल्यास कळवू, असे पत्र पोलिसांनी फिर्यादींना पाठवले आहे. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.
फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे पुष्कराज प्रदीप सोनार (वय ३७, रा. मंडलिक पार्क, राजारामपुरी, १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांच्या घरात ९ एप्रिलच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी झाल्यानंतर सोनार यांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरटे लवकरच सापडतील, असे फिर्यादी सोनार यांना वाटत होते. मात्र, काही दिवसातच घरफोडीचा तपास पोलिसांच्या फाईलमध्येच राहिला.
सोनार यांनी पोलिस ठाण्यात वारंवार हेलपाटे मारून पाठपुरावा केला. पण, 'तपास सुरू आहे. नंतर या.' एवढेच उत्तर त्यांना मिळाले. गेल्याच आठवड्यात त्यांना पोस्टाने राजारामपुरी पोलिसांचे सूचना पत्र मिळाले. त्यात म्हंटले आहे की, 'आपली चोरीस गेलेली मोटारसायकल व चोरी करणाऱ्या चोरट्यांचा आजअखेर शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, कारचा अगर चोरट्यांचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून आल्यास व पुढे गुन्ह्याचा तपास चालू केलेस आपणास कळवले जाईल.' याचा अर्थ पोलिसांनी तपास थांबवला असाच होतो. त्यामुळे १४ लाखांच्या दागिन्यांची चोरी झालेले सोनार कुटुंब हवालदिल झाले आहे.
न घडलेल्या गुन्ह्याचा तपास
पोलिसांच्या सूचना पत्रानुसार त्यांनी दुचाकी आणि कार चोरीचा तपास केला. परंतु, सोनार यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली असताना, पोलिसांनी त्यांना दुचाकी आणि कार चोरीच्या तपासाचे पत्र पाठवल्याने यातून पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
पोलिसांची सारवासारव
याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, 'कर्मचाऱ्यांनी नजरचुकीने फिर्यादींना पत्र पाठवले असावे. या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्नाटकात निपाणीपर्यंत पथक गेले होते. लवकरच चोरट्यांचा शोध लागेल,' असे त्यांनी सांगितले.