पाचगावमध्ये दीड लाखांची घरफोडी, आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 02:00 PM2021-06-22T14:00:50+5:302021-06-22T14:02:07+5:30
Crimenews Kolhapur : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड लाखांचा ऐवजावर हात साफ केला.
कोल्हापूर : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड लाखांचा ऐवजावर हात साफ केला.
पाचगाव (ता. करवीर) येथील सहजीवन हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये रोकड व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत गुरुदत्त प्रकाश शिंदे यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, पण तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव येथे सहजीवन हौसिंग सोसायटीमध्ये गुरुदत्त शिंदे हे राहतात. शनिवारी मध्यरात्री जेवण करुन सहकुटुंब ते पहिल्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
आतील तिजोरीतील दीड तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मीहार, पुष्कराज खडा असलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी, पाचूचा खडा असलेली साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅमची सोन्याची नथ तसेच साडेआठ हजाराची रोकड असा सुमारे १ लाख ५४ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
शिंदे हे सकाळी उठल्यानंतर तळमजल्यावर आल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले, त्यांनी आत जाऊन पाहिले असता तिजोरीसह कपाटातील कपड्यासह इतर साहित्य विस्कटले होते. त्यानंतर घरफोडीचा प्रकार उघड झाला. घटनेनंतर करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, करवीर पोलीस ठाण्यातील सपोनि विवेकानंद राळेभात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
डॉग स्कॉट व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते, पण चोरट्यांचा माग निघाला नाही. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीची नोंद झाली आहे. दरम्यान, याच परिसरात चोरट्यांनी आणखी दोन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.