पर्यटकांना खुणावतोय बर्कीचा धबधबा --पांढरेशुभ्र धबधबे, निसर्गरम्य परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:47 PM2019-07-01T23:47:54+5:302019-07-01T23:52:48+5:30
पावसाळा सुरू झाला की, निसर्गप्रेमींना ओढ लागते ती वर्षा सहलीची व निसर्गस्थळांना भेट देण्याची.
अणुस्कुरा : पावसाळा सुरू झाला की, निसर्गप्रेमींना ओढ लागते ती वर्षा सहलीची व निसर्गस्थळांना भेट देण्याची. अशीच पर्यटकांची पावलं सरसावली आहेत ती शाहूवाडी तालुक्यातील बर्की येथील सुमारे अडीचशे फूट उंचीवरून कोसळणारा बर्की येथील नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी..!
कोल्हापूरहून कळे -बाजारभोगाव - करंजफेण मार्गे सुमारे ६५ किलोमीटरचा वळणावळणाचा प्रवास केल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य बर्की गावात आपण पोहोचतो. येथील निसर्ग सौंदर्य साठवायला नजर कमी पडते. वाऱ्याच्या संगीतावर डोलणारं माळरान, कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, मनाला अगदी वेड लावून टाकतात. कोसळणारा मेघराजा, हिरवीगार शाल पांघरलेल्या डोंगर रांगा, बर्की जलाशयाचे निळेशार पाणी आणि या पाण्यातून बोटिंगचा थ्रिलिंग वाटणारा जलप्रवास जणू आपल्याला प्रति महाबळेश्वरचाच अनुभव देतो.
दगडी पायवाट, हिरवीगार झाडी ओलांडून जाताना एक मस्त नेचर ट्रेकही आपणास अनुभवता येतो. त्यानंतर आपणास दिसतो तो सुमारे अडीचशे फूट उंचीवरून कोसळणारा पांढराशुभ्र फेसाळलेला धबधबा! पावसात कोसळणाºया धबधब्याखाली भिजण्याचा स्वर्गीय आनंद पर्यटकांना वेड लावून टाकतो. तिथल्या सौंदर्याने ओथंबलेल्या निसर्गाचे वर्णन करावयास शब्दही अपुरे पडतात. हिरवेगार डोंगर पाहताना निसर्गाने ओढलेली जणू हिरवीगार चादरच आपणास भासते. त्या सौंदर्यात भर म्हणून वनविभागाने केलेली दगडी पायवाट, पक्षीनिरीक्षक मनोरे, सुंदर पॅगोडे हे पर्यटकांना खास आकर्षित करत आहेत. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर खास बर्की ग्रामस्थांनी बनवलेल्या चुलीवरच्या नाचण्याच्या भाकरी, ओल्या मिरचीचा ठेचा, आदी जेवणाचा आस्वाद येथे घेता येतो.
पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद जरूर घ्यावा; परंतु कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये व तरुणाईच्या बेशिस्त वर्तनामुळे निसर्ग सौंदर्याला गालबोट लागेल असे वर्तन कोणीही करू नये त्यासाठी शाहूवाडी पोलिसांना विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे.
- आनंद पाटील,
अध्यक्ष बर्की, ग्रामदान मंडळ