Kolhapur News: पंतप्रधान मोदींच्या प्रतीकात्मक पुतळा दहनप्रकरणी 'मविआ'च्या २९ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:18 PM2023-03-28T12:18:55+5:302023-03-28T12:21:57+5:30
पोलिसांनी दिलेल्या सूचनेला आंदोलकांनी जुमानले नाही
इचलकरंजी : रस्ता वाहतूक बंद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्या २९ जणांवर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह सहकारी पक्षांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाचे राजन मुठाणे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, संजय कांबळे, हारूण खलिफा, बाबासाहेब कोतवाल, प्रमोद खुडे, नागेश शेजाळे, युवराज शिंगाडे, सादिक जमादार, अब्राहम वाघमारे, अभिजित रवंदे, ताजुद्दिन खतीब, मुजम्मील मुजावर, शशिकांत देसाई, भूषण शहा, प्रमोद नेजे, मीना बेडगे, बिसमिल्ला गैबाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, अमोल भाटले, सतीश टेकाळे, प्रताप होगाडे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सयाजी चव्हाण, महादेव गौड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदा मलाबादे, भरमा कांबळे, शेतकरी संघटनेचे जयकुमार कोले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांचे खासदारपद रद्द झाले, याविरोधात महाविकास आघाडीने मलाबादे चौकात निदर्शने करताना रस्ता बंद करून वाहतूक रोखली, याबाबत पोलिसांनी दिलेल्या सूचनेला आंदोलकांनी जुमानले नाही. त्यांनतर प्रतीकात्मक पुतळ्याच्या तोंडाच्या भागावर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आणि प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, असे पोलिस कॉन्स्टेबल बाजीराव पोवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.