अभाविपचे यल्गार आंदोलन :परीक्षा शुल्काच्या माफीसाठी राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 03:49 PM2020-09-07T15:49:55+5:302020-09-07T15:52:11+5:30
कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
कोल्हापूर : कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
या प्रवेशव्दारात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री तुम एक काम करो, खुर्ची छोडो तुम आराम करो, परीक्षा शुल्क आमच्या हक्काचे, अशा घोषणा देत राज्य शासन आणि विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना दिले.
या आंदोलनात अभाविपचे महानगरमंत्री ऋषिकेश माळी, सहमंत्री अर्थव स्वामी, करवीर तालुकाप्रमुख सोहम कुऱ्हाडे, जिल्हा कार्यालयमंत्री रेवती पाटील, ऋतुजा माळी, पूर्वा मोहिते, राहुल बुडके, समृध्दी उपाध्ये, आदी सहभागी झाले.
अन्य मागण्या
१) शिकवणी शुल्क माफ करावे.
२) महाविद्यालय विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क भरण्यात चार टप्पे द्यावेत.
३) बढती दिलेल्या विद्यार्थ्यांना पुर्नमूल्यांकनाची सुुविधा द्यावी.
४)जिल्हानिहाय विद्यार्थी तक्रार निवारण केंद्राची स्थापन करावी.
कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क कमी करावे. परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी अभाविपकडून वारंवार करूनही सरकार आणि विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आम्ही यल्गार आंदोलन केले. या मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.
-ऋषिकेश माळी