शिरढोणमध्ये ऊर्जामंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:52+5:302021-03-23T04:25:52+5:30
कुरुंदवाड : थकीत घरगुती वीज बिल भरण्यासाठी पाच हप्त्यांत मुदतवाढ मिळावी, थकबाकीच्या कारणातून ग्राहकांची तोडलेली वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात ...
कुरुंदवाड : थकीत घरगुती वीज बिल भरण्यासाठी पाच हप्त्यांत मुदतवाढ मिळावी, थकबाकीच्या कारणातून ग्राहकांची तोडलेली वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी तसेच घरगुती वीज बिल माफीबाबत खोटी आश्वासने दिल्याच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावचावडी चौकात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व डीपीआय तालुकाध्यक्ष सतीश भंडारे यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी बोंब मारत महावितरण व वीजमंत्र्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
दरम्यान, दुपारी कुरुंदवाड महावितरण विभागाचे सहायक अभियंता सिकंदर मुल्ला यांनी आंदोलकांची भेट घेऊन वीज ग्राहकांची उर्वरित पन्नास टक्क्यांची रक्कम पाच हप्त्यांत भरण्यास मुभा दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत चव्हाण, स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे, उपसरपंच संभाजी कोळी, पोलीस पाटील जाधव उपस्थित होते. आंदोलनात निवास कांबळे, प्रकाश भंडारे, दावल नदाफ, आयुब मुजावर, बंडू कांबळे यांच्यासह डीपीआयचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावचावडीसमोर डीपीआयच्या वतीने वीज बिलांच्या निषेधार्थ वीजमंत्री नितीन राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.