राजापुरात ‘बर्निंग’ टेम्पो
By Admin | Published: June 6, 2015 12:03 AM2015-06-06T00:03:49+5:302015-06-06T00:24:21+5:30
साहित्याचे नुकसान : सावंतवाडीकडे जाताना अचानक पेट घेतला
राजापूर : मुंबईकडून संगमेश्वरकडे जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली. सुदैवाने प्राणहानी टळली असून, राजापूर नगर परिषदेकडून पाण्याचे पंप मागवून आग आटोक्यात आणली गेली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प होती. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. टेम्पोत केमिकल असल्यामुळे आग लवकर पसरली.
साबण बनवण्याचे केमिकल व जॉन्सन कंपनीच्या लहान मुलांच्या उत्पादनाची वाहतूक करणारा एक टेम्पो (जीए ०४ टी ०९५७) भिवंडीकडून सावंतवाडीकडे जात होता. हा टेम्पो अब्दुल असगावकर चालवत होते. सायंकाळी ४.३० दरम्यान विश्रामगृहाजवळील अवघड वळणावर आला असता टेम्पोने अचानक पेट घेतला व थोड्या वेळात संपूर्ण टेम्पोला आगीच्या ज्वाळांनी वेढले. ही घटना पाहून वरच्या पेठेतील नागरिक घटनास्थळी धावून आले व त्यांनी राजापूर पोलिसांशी संपर्क साधला.
थोड्या वेळाने नगरपालिकेच्यावतीने दोन टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले व जळत्या टेम्पोवर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. या गाडीत निळ्या रंगाचे ड्रम खचाखच भरले होते. साबण बनवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल व जॉन्सन कंपनीची उत्पादने त्यात होती. हे. कॉ. एन.व्ही. राडे, योगेश भाताडे, मनिष मिल्के, कदम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)