बसस्थानक स्थलांतर हाच पर्याय
By admin | Published: August 7, 2015 10:56 PM2015-08-07T22:56:19+5:302015-08-07T22:56:19+5:30
नागरिकांच्या प्रतिक्रिया : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय, ...तरच क्रांती चौक मोकळा श्वास घेईल
जयसिंगपूर : शहराच्या वाहतूक कोंडीला केंद्रबिंदू ठरलेले बसस्थानक स्थलांतर हाच पर्याय पुढे आला आहे. बसस्थानक स्थलांतर झाल्यास वाहतूक सुरळीत होईल व नव्याने बसस्थानक सुसज्ज होईल. यासाठी आता उठाव होणे गरजेचे आहे. नगरपालिका कोणती भूमिका घेते, शिवाय सर्वपक्षीय ताकद या प्रश्नासाठी लागणार का, हाच प्रश्न खऱ्या अर्थाने चर्चेत आला आहे.
शहरातील प्रमुख वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची गरज आणि बसस्थानकाचे स्थलांतर या प्रश्नावर ‘लोकमत’ने वृत्त
प्रसिद्ध केल्यानंतर याप्रश्नी अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करून बसस्थानक स्थलांतर गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले. पर्यायी जागा निर्माण करून कोणत्याही परिस्थितीत बसस्थानक स्थलांतर झाल्यास निश्चितच क्रांती चौक मोकळा श्वास घेऊ शकतो. शिवाय वाहतुकीला शिस्त लागणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे अभिनंदन
जयसिंगपुरातील वाहतूक कोंडी व वाहतुकीला अडचणीचे ठरणारे बसस्थानक स्थलांतरचा विषय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. या विषयाचा पाठपुरावा करण्याची मागणी केली.
शहरात पर्यायी जागा असेल तर बसस्थानकाचे स्थलांतर निश्चित करावे. प्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- अॅड. संभाजीराजे नाईक, शिवसेना
क्रांती चौकातील वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करून बसस्थानक स्थलांतर होणे ही गरजेची बाब बनली असून यासाठी स्वाभिमानी पक्षाकडून निश्चित पाठपुरावा केला जाईल.
- डॉ. महावीर अक्कोळे
बसस्थानक स्थलांतर झाल्यास निश्चितच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. लोकांना ये-जा करणे सोयीस्कर होणार असून यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.
- डॉ. नलिनी पाटील
प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेली जागा नव्या बसस्थानकासाठी सोयीस्कर आहे. सध्या या जागेत डुकरांचा उपद्रव वाढला असून दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली आहे. याठिकाणी बसस्थानक झाल्यास सुकर व सोयीस्कर होईल. - सुजित दानोळे
झेले चित्रमंदिर, क्रांती चौक, नांदणी रस्ता ही तीन प्रमुख ठिकाणे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यास कारणीभूत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता बसस्थानक स्थलांतर हा पर्याय ठरणार असून महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेली सुमारे साडेचार एकर जागा यासाठी उपयुक्त ठरेल.
- अस्लम फरास, नगरसेवक
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सम-विषम प्रमाणात वाहतुकीचा आराखडा तयार केल्यानंतर काहीअंशी वाहतुकीला शिस्त लागली होती. मात्र, यामध्ये सातत्य राहिले नाही. बसस्थानकाचे स्थलांतर झाल्यास व वाहतूक आराखड्यानुसार नियोजन झाल्यास निश्चित जयसिंगपूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार आहे.
- नितीन पाटील,
अध्यक्ष इंजिनिअर असोसिएशन
सध्या असलेले बसस्थानक वाहतुकीच्या कोंडीस निमंत्रण देणारेच आहे. बसेस येण्याचे व जाण्याचे दोन मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या असणारे हे बसस्थानक स्थलांतर झाल्यास निश्चितच हा मार्ग वाहतुकीस सोयीस्कर ठरणार आहे.
- संतोष डोके, सहा. पो. निरीक्षक