प्रवाशांअभावी आजरा आगाराची बस सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:36+5:302021-04-16T04:23:36+5:30
आजरा आगारातून दररोज कोल्हापूर, बेळगाव, गडहिंग्लज, आंबोली, पुणे, मुंबई यासह ग्रामीण भागात फेऱ्या सुरू आहेत. मात्र, आजपासून कोरोनाचा संसर्ग ...
आजरा आगारातून दररोज कोल्हापूर, बेळगाव, गडहिंग्लज, आंबोली, पुणे, मुंबई यासह ग्रामीण भागात फेऱ्या सुरू आहेत. मात्र, आजपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचे चाक पुन्हा थांबले आहे.
आजरा आगाराने सकाळी कोल्हापूर, बेळगाव व गडहिंग्लज या मार्गावर बसेस सोडल्या होत्या. मात्र, कोल्हापूर वगळता अन्य ठिकाणी प्रवासी मिळाले नाहीत.
कोल्हापूरला जाऊन येण्यासाठी फक्त २६०० रुपये उत्पन्न मिळाले. अन्यवेळी कोल्हापूरला आठ ते नऊ हजारांचे उत्पन्न मिळते. गुरुवारी झालेल्या फेरीत फक्त डिझेलचा खर्च मिळाला आहे.
आजरा आगाराला उन्हाळ्याच्या हंगामात दररोज ३ ते ३.५० लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, वीकेंड लॉकडाऊन व आजपासून सुरू झालेल्या संचारबंदीमुळे एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे आजरा आगाराला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
नोकरीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा पगारही भागविणे चालू महिन्यात अडचणीचे झाले आहे. याबाबत आजरा आगाराचे वाहतूक निरीक्षक आयुब मुल्ला यांच्याशी संपर्क साधला प्रवाशांसाठी बसेस सॅनिटायझर करून सोडल्या आहेत. मात्र, प्रवासी न आल्यामुळे आगारात बसेस थांबून आहेत.
उद्या फक्त कोल्हापूरसाठी बस सोडली जाणार आहे, तर अन्य मार्गावर बसची मागणी आल्यास ती सोडली जाईल असे सांगण्यात आले.