‘कर्नाटक’कडील बससेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:50+5:302021-03-15T04:21:50+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळल्यानंतर कोल्हापूरकडून बेळगावकडे होणारी एमएसआरटीसीची एस. टी. बससेवा रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही ...
कोल्हापूर : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळल्यानंतर कोल्हापूरकडून बेळगावकडे होणारी एमएसआरटीसीची एस. टी. बससेवा रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आली. दरम्यान, कर्नाटक राज्य परिवहनचीही कोल्हापूरकडे येणारी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शिवसेना प्रमुखांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १३) सकाळी कोल्हापूर - स्वारगेट (पुणे) बसवर एका कानडीप्रेमीने दगडफेक केली. त्यामुळे बेळगावकडे महाराष्ट्र राज्य परिवहनतर्फे होणारी बससेवा बंद करण्यात आली. यात बेळगाव मार्गावर २० बसेस धावतात. त्यातून दिवसभर ८० फेऱ्या या मार्गावर होता. त्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही कोल्हापूर मार्गावर बंद करण्यात आल्या आहेत. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून बेळगावकडे जाणारे व येणारे हजारो प्रवासी आहेत. त्यांना बससेवा बंद केल्यामुळे खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. हे अर्थिकदृष्ट्या खिशाला परवडणारे नसल्याने अनेकांनी दोन्ही बाजूंनी ही सेवा सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कापशीमार्गे गडहिंग्लज
एस. टी. महामंडळाच्या काही बसेस सिद्धनेली (कागल) नदीमार्ग, केनवडेमार्गे, कापशी, माद्याळ, गडहिंग्लज अशा धावल्या.