कर्नाटकात पुन्हा बससेवा सुरू, जिल्ह्यातून दिवसभरात २५ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:23 PM2021-03-04T12:23:17+5:302021-03-04T12:26:21+5:30
state transport Kolhapur-तब्बल नऊ दिवस बंद असलेली कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग (एस.टी)ची बससेवा बुधवारपासून सुरू झाली. सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूरसह आजरा, चंदगड, कागल, गारगोटी आदी आगारांतून कर्नाटकात २५ बसच्या फेऱ्या झाल्या.
कोल्हापूर : तब्बल नऊ दिवस बंद असलेली कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग (एस.टी)ची बससेवा बुधवारपासून सुरू झाली. सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूरसह आजरा, चंदगड, कागल, गारगोटी आदी आगारांतून कर्नाटकात २५ बसच्या फेऱ्या झाल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर अर्थात कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य केला होता. त्यामुळे बेळगावकडे जाणारी एस.टी.सेवा बंद होती. त्याच्या परिणामी कोल्हापूरसह राज्यभरातून कर्नाटकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. यासह राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला.
प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या सोयीकरिता एस.टी.च्या कोल्हापूर विभागाकडून कोगनोळी नाका , कर्नाटक पोलीस, बेळगाव जिल्हा प्रशासन यांच्याशी सलगपणे सात दिवस बोलणी केली. यात प्रवाशांचे हाल होत असल्याचे त्यांना पटवून दिले. त्यामुळे अखेरीस समजुतीने का होईना कर्नाटक प्रशासनाने वाहतुकीस मंजुरी दिली.