आजरा आगारातून तब्बल २६ दिवसानंतर बस सेवा सुरू, प्रवाशांमधून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 03:06 PM2021-12-03T15:06:38+5:302021-12-03T15:08:50+5:30
आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगारातून आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या.
आजरा : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे एसटीची वाहतूक कोलमटली होती. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढत चांगली पगारवाढ दिली. तरीही काही कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. तर कामावर हजर व्हा नाहीतर कारवाईला सामोरे जा अशी सरकारने भूमिका घेतली आहे. यामुळे काही कर्मचारी भितीने कामावर हजर झाले आहेत. परिणामी काही ठिकाणी एसटीची वाहतूक सुरु झाली आहे.
कोल्हापूर आगारातूनही काही प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. यात आता आजरा आगारातूनही आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या. गडहिंग्लज, देवकांडगाव मार्गासह गवसे, नेसरी, लाटगाव या मार्गावर बाजारगाडी म्हणून बसेस धावल्या आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संप असतानाही चालक-वाहक यांनी एस.टी.सुरू करण्याबाबत सहकार्याची भूमिका घेतली आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगार व्यवस्थापक पृथ्वीराज चव्हाण गेले अनेक दिवस चालक वाहक यांना कामावर हजर होणे बाबत विनंती करीत आहेत. अखेर आज थोड्या प्रमाणात त्याला यश आले आहे. आजरा आगारातून चार बसेस सुरू झाले असून आणखीनही बसेस सुरू करण्याबाबत कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या निलंबनापेक्षा थोड्या प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आजरा आगारला यश आले आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.