आजरा आगारातून तीन मार्गावर धावल्या बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:31+5:302021-06-11T04:17:31+5:30
आजरा : आजरा बस स्थानकातून गुरुवारी पुणे, कोल्हापूर व गडहिंग्लज मार्गावर एसटी बसेस धावल्या. तिन्ही मार्गावर प्रवासी मिळाल्याने एसटीला ...
आजरा
: आजरा बस स्थानकातून गुरुवारी पुणे, कोल्हापूर व गडहिंग्लज मार्गावर एसटी बसेस धावल्या. तिन्ही मार्गावर प्रवासी मिळाल्याने एसटीला चांगले उत्पन्न मिळाले आहे. तीन मार्गातून ३० हजारांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट संपत असतानाच एसटीने पूर्वपदावर येण्यास सुरुवात केली आहे. गेले अडीच ते तीन महिने आजरा आगाराची एसटी सेवा पूर्णपणे ठप्प होती. आता दोन दिवसांपासून आजरा बस स्थानकावरून कोल्हापूर, पुणे व गडहिंग्लज मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या. मात्र प्रतिसाद अल्प होता. गुरुवारी पुणे मार्गावर २५ प्रवासी तर कोल्हापूर मार्गावर २९ प्रवाशांनी आजऱ्यातून प्रवास केला. कोल्हापूर मार्गातून ९ हजार तर पुण्याहून १९ हजारांचे उत्पन्न मिळाले. गडहिंग्लजला तीन फेऱ्यांमध्ये ही २५ ते २८ प्रवासी होते. या तिन्ही फेऱ्यांमधून एसटी आगाराला २ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
आजरा आगाराने एसटीमध्ये स्वच्छता ठेवून सॅनिटायझरचा वापर केलेला आहे. आज कोरोना लाॅकडाऊननंतर प्रवासीवर्गाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रवासी वर्ग आकर्षित होत आहे. आजरा सूतगिरणीसह अन्य छोट्या-मोठ्या उद्योगात जाणारे व कोल्हापूर येथे नोकरीसाठी असणाऱ्या प्रवाशांनी पुन्हा एसटीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आजरा आगाराची एसटी सेवा पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागली आहे. या पुढील काळात प्रवाशांची गरज पाहून ग्रामीण मार्गावर बसेस सोडण्याचा आजरा आगाराचा प्रयत्न आहे, अशी माहिती वाहतूक निरीक्षक मोहन पोवार यांनी दिली.