विवाह जुळवणाऱ्या एजंटच्या आडून फसवणुकीचा धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:13+5:302021-03-20T04:22:13+5:30

कोपार्डे : विवाह जुळविण्यासाठी ग्रामीण भागात अनेक एजंट कार्यरत झाले असून, विवाहोत्सुक तरुण- तरुणी व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक लूट ...

The business of cheating under a marriage matching agent | विवाह जुळवणाऱ्या एजंटच्या आडून फसवणुकीचा धंदा

विवाह जुळवणाऱ्या एजंटच्या आडून फसवणुकीचा धंदा

googlenewsNext

कोपार्डे : विवाह जुळविण्यासाठी ग्रामीण भागात अनेक एजंट कार्यरत झाले असून, विवाहोत्सुक तरुण- तरुणी व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक लूट राजरोस केली जात आहे. या एजंटांकडून विवाहोत्सुकांची माहिती दिल्याबद्दल आणि असे विवाह जुळून आल्यानंतर मागितला जाणारा मेहनताना पाच हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथील एका महिलेला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एजंटमुळे आपला प्राण गमवावा लागल्याने एजंटांचा सुळसुळाट चव्हाट्यावर आला आहे.

सध्या विवाहोत्सुक तरुणांना मुली मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुलींच्या व तिच्या आई- वडिलांच्या अपेक्षा वाढल्याने मोठी शेती असली तरी नोकरीची अपेक्षा मुलीच्या नातेवाइकांकडून बाळगली जात आहे. विशेषतः मराठा समाजातील मुलांना शासकीय नोकरीमध्ये फारच कमी संधी मिळत असल्याने नोकरी नसल्याच्या कारणाने विवाह जुळून येणे मोठी तारेवरची कसरत झाली आहे. याचाच फायदा उठवणारे अनेक एजंट ग्रामीण भागात कार्यरत झाले आहेत. या एजंटकडून मुलाचे अथवा मुलीचे स्थळ सुचवण्यासाठी हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. चांगले स्थळ मिळावे म्हणून उपवर तरुण व नातेवाईक या एजंटांच्या मागणीला बळी पडत आहेत. लग्न ठरल्यानंतर पाच हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत एजंटकडून मागणी केली जात आहे.

अलीकडेच पन्हाळा तालुक्यातील सधन कुटुंब असलेल्या छबूताई केरबा पाटील या महिलेचा अशा लग्न ठरवणाऱ्या एजंटने खून केल्याने हा विषय ग्रामीण भागात चर्चेला येऊ लागला आहे. छबूताई पाटील यांची दोन मुले खाजगी संस्थेत चांगल्या पगारावर नोकरीत आहेत. याशिवाय चांगली जमीनही आहे. पती केरबा पाटील हे अंथरुणाला खिळून असल्याने त्यांच्या डोळ्यादेखत आपल्या मुलांचा विवाह करण्यासाठी छबूताई धडपडत होत्या. प्रकाश कुंभार या एजंटने छबूताई यांची ही अगतिकता ओळखून त्याचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न केला. अत्यंत कष्टाळू असलेल्या छबूताई यांना मुली पाहण्यासाठी बोलावून या एजंटने त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या हव्यासापोटी त्यांचा गळा दाबून त्यांना ठार मारले. यामुळे हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. या कुटुंबाला दोन वेळच्या जेवणासाठी घरात महिला नसल्याने घरात चांगली परिस्थिती असतानासुद्धा अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: The business of cheating under a marriage matching agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.