कोल्हापुरातील व्यवसाय पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:13+5:302021-07-27T04:24:13+5:30
गेले तीन महिने शहरात कोरोना संसर्गाने उन्माद मांडला होता, त्यातून सावरतो न सावरतो तोच अतिवृष्टीने कोल्हापूरकरांना दणका दिला. गडबडलेल्या, ...
गेले तीन महिने शहरात कोरोना संसर्गाने उन्माद मांडला होता, त्यातून सावरतो न सावरतो तोच अतिवृष्टीने कोल्हापूरकरांना दणका दिला. गडबडलेल्या, गोंधळलेल्या कोल्हापूरकरांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. कोरोनाचे संकट कमी होत आहे, तर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन रुळावर येण्यास सुरुवात झाली. सोमवारी शहरातील सर्वच व्यवसाय पूर्ववत सुरू झाले. हॉटेल, रेस्टॉरंट, वाईन शॉपसह सर्वांनाच आता परवानगी मिळाल्याने कोल्हापूरकरांच्या आयुष्याचा गाडा नव्याने सुरू झाला.
कोल्हापुरात बुधवारपासून पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला होता. दुकाने सुरू असूनही ग्राहक घरातून बाहेर पडला नाही. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस अनेक दुकानदारांनी आपले व्यवसाय बंद ठेवून घरातून बाहेर पडण्याचे टाळले. एकीकडे पाऊस, घरात, दुकानातून शिरलेले महापुराचे पाणी, तर दुसरीकडे अन्य भागातील दुकानेच बंद यामुळे शहरावर अवकळा पसरली होती; परंतु सोमवारचा दिवस मात्र काहीसा आशादायक परिस्थिती घेऊन उजाडला.
महापुराचे पाणी ओसरल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. आजूबाजूच्या गावातून भाजीपाला आल्याने भाजी मंडई गजबजून गेल्या. पाऊस उघडल्यामुळे सर्वच बाजारपेठा उघडल्या. तब्बल ११० दिवसांनी शहरात सर्व व्यवसाय पुन्हा नव्या उमेदीने सुरू झाले. कापड मार्केट, मोठी रेस्टॉरंट, हॉटेल सुरू झाली. शहरातील खाऊगल्ल्या, खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील वर्दळ वाढली. त्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक चित्र निर्माण झाले.