उद्योजकाचा खून सावकारीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:02 AM2019-01-21T00:02:20+5:302019-01-21T00:02:25+5:30
इचलकरंजी : येथील उद्योजक अशोक छापरवाल यांचा बेकायदेशीर सावकारीतून खून झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तारदाळ (ता. हातकणंगले) येथील ...
इचलकरंजी : येथील उद्योजक अशोक छापरवाल यांचा बेकायदेशीर सावकारीतून खून झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तारदाळ (ता. हातकणंगले) येथील संदीप गुरव (वय २९) याने त्याचा चुलतभावाच्या साहाय्याने तलवारीने घाव घालून निर्घृण खून केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उद्योजक अशोक छापरवाल यांचा मानेवर घाव घालून खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली होती. त्यांचा मृतदेह तारदाळ येथील महेश को-आॅप. स्पिनिंग मिलजवळील माळरानावर मिळाला होता. याप्रकरणी पोलिसांची चक्रे वेगाने फिरूनसुद्धा त्याचा तपास लागत नव्हता. अखेर या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी आपले लक्ष शहरातील सीसीटीव्ही आणि खासगी सीसीटीव्हीवरील फुटेज तपासणीकडे वळविले. या फुटेजमधूनच पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
गुन्ह्यातील संशयित आरोपी संदीप महावीर गुरव (रा. श्रीरामनगर, गल्ली नं.४, तारदाळ) याचा यंत्रमाग कारखाना होता. त्यातूनच अशोक छापरवाल यांची व संदीपची ओळख होती. दोघांनी तारदाळ येथे शिसपेन्सिल तयार करण्याचा कारखाना काढण्याचे ठरविले. त्यासाठी अशोकने संदीपला दहा टक्के व्याजाने ९ लाख ५८ हजार रुपये दिले होते. त्या रकमेची अशोक यांनी मागणी केली होती. मात्र, पेन्सील उत्पादनातून महिन्याला फक्त ४० ते ४५ हजार रुपये इतकेच मिळत असल्याने संदीप व्याजाची रक्कम देऊ शकत नव्हता. व्याज आणि मुद्दल लवकर फेडण्यासाठी अशोकने तगादा लावला होता. तसेच दमदाटीही केली होती.
अशोक यांच्याकडून संदीप यास मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने त्याचा चुलतभाऊ प्रतीक उर्फ बंड्या भाऊसाहेब गुरव (२२, रा. नेर्ली, ता.करवीर) यास बोलावून घेतले. या दोघांनी मिळून अशोक यांच्या हत्येचा कट रचला.
अशोक यांना चरस व गांजाचा व्यापार करण्याचे आमिष दाखवून त्यांना गुरुवारी (दि.१७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तारदाळ येथे बोलावून घेतले. चरस आणि गांजाची पाकिटे दाखविण्यासाठी त्यांना महेश स्पिनिंग मिलकडे नेण्यात आले. रात्रीच्या अंधारात चरस-गांजाची पाकिटे दाखविण्याचा बहाणा प्रतीकने केला. त्यावेळी मागे असलेल्या संदीपने तलवारीचा घाव अशोक यांच्या मानेवर घातला. घाव वर्मी लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि थोड्याच वेळात गतप्राण झाले. दोघाही संशयितांनी मृतदेह तेथेच टाकून मोटारसायकलवरून तारदाळला आले.
याचा सुगावा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला लागताच त्यांनी सापळा रचून तारदाळ येथे या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली, असेही अतिरिक्त पोलीस अधीक्षक घाडगे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, हातकणंगले पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, आदी उपस्थित होते.
पोलिसांच्या कारणाबद्दल संशय
चरस व गांजाच्या व्यापारातून मोठा नफा कमविण्याचे आमिष संशयितांनी अशोक यांना दाखविल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी हा त्यांचा जावईशोध असल्याची चर्चा आहे. कारण अशोक हे व्याजाने पैसे देऊन पैसे मिळवत असताना ते चरस व गांजा विक्रीकडे वळतील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.