गांधीनगर, उचगाव, वळीवडेतील व्यावसायिकांना पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:08+5:302021-07-28T04:26:08+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट, त्यात महापुराचा फटका बसल्याने येथील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गांधी ...
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट, त्यात महापुराचा फटका बसल्याने येथील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गांधी नगर व्यापारी पेठेवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. तावडे हॉटेल परिसरात हॉटेल व्यावसायिक, कन्फेक्शनरी, ड्रायफूट, फर्निचर, लाईट हाऊस, गॅस स्पेअर पार्ट, भांडी दुकाने अशी दुकाने अक्षरक्ष: आठ ते दहा फूट पाण्याखाली होती. गणेश टॉकीजजवळ मुख्य रस्त्यावर असणारी रेडिमेट कापड दुकाने, तसेच आर्ट गॅलरी, साड्यांच्या दुकानात ओढ्याचे पाणी शिरल्याने दुकानातील साहित्यांची नासाडी झाली आहे.
पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तावडे हॉटेल चौकात दहा फूट पाण्याची पातळी होती. त्यामुळे कोल्हापूर गांधीनगर हा मार्ग पूर्णत: तीन दिवस बंद राहील. वळीवडे हद्दीतील कुटिया मंदिर परिसर अद्याप पाण्याने वेढला आहे. नागरिकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने पूरग्रस्त भागातील दुकानदारांची मंगळवारी स्वच्छतेची लगबग सुरू होती. त्यामुळे विस्कटलेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
चौकट १):-पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्याने दुकानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुराचा विळखा असलेल्या भागात पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा कुजू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याअगोदरच संबंधित ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
२७ गांधीनगर पूर
फोटो ओळ- तावडे हॉटेल परिसरातील व्यावसायिक पूर ओसरल्यानंतर दुकानाची स्वच्छता करण्यात व्यस्त होते.