कुरुंदवाड पालिकेसमोर व्यावसायिकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:34+5:302021-05-11T04:25:34+5:30
कुरुंदवाड : कडक लॉकडाऊनच्या विरोधात शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी निखिल जाधव येताच त्यांच्यावर प्रश्नांची ...
कुरुंदवाड : कडक लॉकडाऊनच्या विरोधात शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी निखिल जाधव येताच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली. तर मुख्याधिकारी जाधव यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व तालुका प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा आदेश दिला असल्याने आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने व्यापाऱ्यांसह मोर्चाचे समर्थन करणारे नगरसेवकही हतबल झाले. मोर्चामध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय होती.
दरम्यान, वातावरण चिघळल्याने सायंकाळी मुख्याधिकारी जाधव यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन अत्यावश्यक सेवा अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने तणाव निवळला. मात्र, भाजीपाला लिलावाच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात सोमवारपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद शहरात उमटले. सकाळी सात ते साडेआठपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने संतप्त व्यापारी व दुकानदारांनी पालिकेवर मोर्चा काढला.
मुख्याधिकारी जाधव पालिकेत अद्याप आले नसल्याने मोर्चेकरी पालिकेसमोरच बसले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याचवेळी मुख्याधिकारी जाधव येताच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कडक लॉकडाऊन न करता दुकाने अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याची मागणी केली.
व्यावसायिक संतापलेले असल्याने काही नगरसेवकांनी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्याधिकारी कक्षात सुमारे एक तास बैठक झाली.
यावेळी जवाहर पाटील, उदय डांगे, अक्षय आलासे, भोला बारगीर, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, लियाकत बागवान, अविनाश गुदले, आयुब पट्टेकरी आदी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
फोटो - १००५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे पालिकेसमोर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी ठिय्या आंदोलन केले.