‘फुलपाखरू’, ‘म्युटेशन’ने जिंकली मने
By admin | Published: February 1, 2015 11:52 PM2015-02-01T23:52:44+5:302015-02-02T00:03:11+5:30
जयसिंगपूर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा : दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी दर्जेदार एकांकिका सादर
जयसिंगपूर : आम्ही रसिक संस्थेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दुसरा दिवस दर्जेदार एकांकिकांनी गाजविला. राजेंद्र पोळ सांस्कृतिक प्रतिष्ठानने सादर केलेली ‘फुलपाखरू’ ही एकांकिका हृदयस्पर्शी ठरली.
विष्णू सुर्या वाघ लिखित व देवीदास अमोणकर दिग्दर्शित ‘तुका अभंग अभंग’ या एकांकिकेने दुसऱ्या दिवशी स्पर्धेस प्रारंभ झाला. त्यानंतर पुणे येथील गंधाली संस्थेने ‘प्रारब्ध’ ही मुरलेंद्र शेटे लिखित व भालचंद्र करंदीकर दिग्दर्शित एकांकिका सादर केली. कोल्हापूरच्या शिंदे अकॅडमीने ‘तमसोमा ज्योर्तिगम्य’ ही एकांकिका सादर केली. आशय स्वरूपात ही एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न झाला. कुडाळच्या सिद्धांत थिएटर्सने ‘क्लिक’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट ठरला. कोल्हापूरच्या फिनिक्स क्रिएशन्सने सादर केलेले ‘बाप बीप बाप’ ही दोन पात्राची एकांकिका प्रभावी झाली. एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई थिएटर्स आयोजित ‘सायलेंट स्क्रीम’ने प्रेक्षकांची मने जिंकली. ऋतुजा बागवे (मुक्ता) हिचा अभियन उत्कृष्ट झाला. तितकीच मोलाची साथ स्वप्निल हिंगडे (तो) ने दिला. सिद्धार्थ साळवींनी दिग्दर्शनात खूपच परिश्रम घेतल्याचे जाणवले.
कोल्हापूरच्या प्रणव थिएटर्स यांनी ‘पी.एल.एस.आर.के.’ ही एकांकिका सादर केली. आशिष भोसले (पी. एल.) ने ग्रामीण ढंगातील मुलगा चांगला वठवला. लिव्ह इन रिलेशनशिप या चर्चेतल्या विषयावर सुंदर भाष्य करणारे सातारा येथील निर्मिती नाट्य समूहाने ‘म्युटेशन’ एकांकिका सादर केली.
सोलापूरच्या अभिव्यक्ती थिएटर्सने ‘मृगजळ’ ही एकांकिका सादर केली. एकांकिकेतील वसुधा (अनुपमा खडे) व माधव (रणधीर अभ्यंकर) ही दोन्ही पात्रे विवाहित असून एकमेकांच्या पे्रमात पडतात आणि शेवटी सगळे मृगजळ असते.
महाशाला कला संगम गोवा यांनी सादर केलेली एकांकिका ‘हिंदवी प्रपातो कोसवला’ एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण झाले आहे.
नक्षत्र थिएटर्स सोलापूर यांनी ‘साठा उत्तराची कहाणी’ ही एकांकिका सादर केली. नानीला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्या अंथरूणास खिळून आहेत. नाना आपल्या पत्नीची दिवसरात्र सेवा करतात. देहदानाचा फार्म भरण्यासाठी नानींना सांगतात, मात्र नानी नकार देते; परंतु मरण्यापूर्वी नानी फार्मवर सही करतात. (प्रतिनिधी)