बुवाचे वाठारमध्ये सभागृहासाठी निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:24+5:302021-07-08T04:17:24+5:30
खोची : कोरोनामुळे स्थानिक विकास निधी देणे अडचणीचे झाले आहे. इतर अनेक योजनेतून निधी देऊन बुवाचे वाठार गावच्या विकासासाठी ...
खोची : कोरोनामुळे स्थानिक विकास निधी देणे अडचणीचे झाले आहे. इतर अनेक योजनेतून निधी देऊन बुवाचे वाठार गावच्या विकासासाठी निधी दिला जाईल. गावातील भव्य बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी लवकरच निधी देण्याची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
बुवाचे वाठार(ता. हातकणंगले)येथे जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या निधीतून २६ लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर होते.
खासदार माने म्हणाले, प्रदूषणाची मात्रा वाढत राहिली तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संदर्भात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रमाण कमी होत चालल्यास लगेचच धोका कमी झाला असे समजू नये. महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी ग्रामस्थांनी एकीने प्रयत्न केले पाहिजेत.
या वेळी डॉ. मिणचेकर, प्रवीण यादव यांची भाषणे झाली. कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत एम. आर. शिंदे, प्रास्ताविक उपसरपंच शंकर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार शिंदे, बी. एल. पाटील यांनी केले. आभार संजय आडके यांनी मानले.
कार्यक्रमास सरपंच रीना शिंदे, अनिल सूर्यवंशी, प्रवीण शिंदे, सुनील चौगुले, शीतल हेरले, सिकंदर पिंजारी, सागर चव्हाण, गुड्डाप्पा शिंदे, निवृत्ती शिंदे, अक्रम शेक, दत्तात्रय पाटील, दिलावर सुतार, बंडू परीट, मदन अनुसे, रामचंद्र अनुसे उपस्थित होते.
फोटो ओळी-बुवाचे वाठार येथे विकासकामांचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रवीण यादव, रीना शिंदे, सुनील चौगुले, शंकर शिंदे, कृष्णात कांबळे, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.