स्लो सर्व्हरमुळे जमीन खरेदी-विक्री ठप्प - दहा दिवसांपासून त्रास :नागरिक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:31 AM2018-12-19T00:31:12+5:302018-12-19T00:31:56+5:30
कोल्हापूर : जमीन अभिलेख (लॅँड रेकॉर्ड)चा सर्व्हर मुद्रांक कार्यालयाशी जोडण्यात आला असून, जमीन अभिलेखचा सर्व्हर गेले दहा दिवस स्लो असल्याने जिल्ह्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : जमीन अभिलेख (लॅँड रेकॉर्ड)चा सर्व्हर मुद्रांक कार्यालयाशी जोडण्यात आला असून, जमीन अभिलेखचा सर्व्हर गेले दहा दिवस स्लो असल्याने जिल्ह्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. राज्यातही अनेक जिल्ह्यांत लोकांना असाच अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार वेळेत होत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत.
मुद्रांक नोंदणी व्यवहार कार्यालयात जमीन खरेदीचा व्यवहार झाला की त्याची आॅनलाईन नोंद संबंधित गावच्या तलाठ्याकडे झाली पाहिजे, अशी व्यवस्था आॅनलाईन सातबारा पद्धतीत केली आहे. असा व्यवहार झाल्याचा संदेशही संबंधित व्यक्तीला मोबाईलवर येतो. महसूल विभागातील तलाठ्यांच्या पातळीवर सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी होणारी लूट टाळण्यासाठी शासनाने ही पारदर्शकता आणली, हे चांगलेच आहे; पण त्यासाठीची तांत्रिक व्यवस्था अजून तितक्या सक्षमपणे काम करीत नाही. सध्या होणारा विलंब हा त्याचाच परिणाम आहे. मूळ जमीन अभिलेखचा सर्व्हर मंद असल्याने खरेदीचे व्यवहार एकदम मंदगतीने सुरू आहेत.
जमीन खरेदी-विक्रीसोबतच घर, प्लॉट विक्री, तारण, भाडेपट्टा करार ही सगळी कामे नोंदणी विभागामार्फत केली जातात. त्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारात जास्त अडथळे येत आहेत.एक व्यवहार झाल्यावर तो पूर्ण झाल्याशिवाय दुसरा व्यवहार करता येत नाही. त्यामुळे अगोदर टोकन घेऊन गेलेले लोक मुद्रांक कार्यालयात बसून वैतागत आहेत.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील प्रतिदिन व्यवहार
मुद्रांक विभागाची एकूण कार्यालये : १८
कोल्हापूर शहरात कार्यालये : ०४
इचलकरंजी : ०२
कोल्हापुरात दिवसाला सरासरी व्यवहार : १००
इचलकरंजीत सरासरी व्यवहार : ४०
मुद्रांक विभागाची वार्षिक उलाढाल
: २५० कोटी
‘एमटीएनएल’च्या कनेक्टिव्हिटीची अडचण असल्याने गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी ही अडचण होती; परंतु आता तशी स्थिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अशी काही अडचण आली असेल तर मी याबाबत आज, बुधवारी चौकशी करून अडचण दूर केली जाईल.
- रामदास जगताप- राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प, महाराष्ट्र शासन
कोल्हापूर जिल्ह्यातील मुद्रांक कार्यालयात हजारो खरेदीचे दस्त पडून आहेत. त्यामुळे लोकांची कुचंबणा होत आहे. हा सर्व्हर बºयाच दिवसांनंतर सकाळी सुरू झाला व दुपारी परत बंद पडला. सध्या लग्नसराई आहे. लोकांना पैशाची गरज असते. त्यासाठी खरेदी-विक्रीचे व्यवहार गतीने होणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही.
- संजय पोवार, संभाजीराजे फाउंडेशन
जमीन महसूल विभागाचा सर्व्हर स्लो असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत; परंतु या विभागाचे राज्य समन्वयक रामदास जगताप हे त्यातून मार्ग काढत आहेत. त्यामुळे मंगळवारी दुपारपासून ही अडचण थोडी दूर झाली आहे.
- सुंदर जाधव, मुद्रांक जिल्हा अधिकारी, कोल्हापूर