‘कंटेनर’ खरेदीत ढपला

By admin | Published: March 30, 2017 01:19 AM2017-03-30T01:19:36+5:302017-03-30T01:19:36+5:30

भूपाल शेटेंचा आरोप : अधिकाऱ्यांची साखळी; ६३ लाखांचा गैरव्यवहार

Buy 'Container' | ‘कंटेनर’ खरेदीत ढपला

‘कंटेनर’ खरेदीत ढपला

Next

कोल्हापूर : आयुक्त पी. शिवशंकर यांच्या पारदर्शक कारभारामुळे गेल्या वर्षभरात महानगरपालिकेत कोणताही घोटाळा झाला नसला तरी ते बढतीवर बदली होऊन जात असताना मात्र लोखंडी कोंडाळे (कंटेनर) खरेदीत अधिकाऱ्यांच्या एका साखळीने ६३ लाखांचा आंबा पाडल्याचा आरोप बुधवारी सत्तारूढ काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी, तसेच महानगरपालिकेची फसवणूक केल्याबद्दल ठेकेदाराविरुद्ध फौजदारी दाखल करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महानगरपालिकेने नुकतेच ३०० लोखंडी कोंडाळे खरेदी केले असून, या कामात घोटाळा झाल्याचा शेटे यांचा आरोप आहे. महानगरपालिकेने नागपूर येथील तिरुपती एंटरप्रायजेस या कंपनीकडून ३०० कंटेनर कचरा कोंडाळे खरेदी केले असून, त्यांची किंमत १ कोटी १८ लाख रुपये इतकी आहे. हे कंटेनर हलक्या दर्जाचे मटेरियल वापरून बनविले आहेत हा शेटे यांचा प्रमुख आक्षेप आहे.
कोंडाळ्याला लोखंडी प्लेट वापरायच्या असताना हलक्या दर्जाचा पत्रा वापरला आहे. त्याचे वजन हे ४३० किलो असायला पाहिजे होते, ते प्रत्यक्षात ३४० किलो आहे. कोल्हापुरातील उद्यम को. आॅप. सोसायटीच्या वजनकाट्यावर त्याचे वजन केल्यावर ही बाब उजेडात आली. ठेकेदाराने एका कंटेनरची किंमत ३९ हजार रुपये लावली आहे. मात्र, त्यांनी वर्कशॉपमध्ये जमा केलेल्या कंटेनरची किंमत ही प्रत्यक्ष १८ हजार रुपयेच आहे. त्यामुळे प्रत्येक कंटेनरमागे २१ हजार रुपये जादा किंमत दिली आहे.
करारात ठरलेल्या अटी व नियमाप्रमाणे कंटेनर आहेत की नाही याची तपासणी करून घेण्याची जबाबदारी वर्कशॉप विभागाचे प्रमुख रावसाहेब चव्हाण, सहायक अभियंता सुनील पुजारी, वाहन निरीक्षक विजयकुमार दाभाडे, अमरकुमार बिसुरे यांची होती. त्यांनी नागपूर येथील कारखान्यास भेट दिली; पण प्रत्यक्षात मटेरियलची पाहणी केली नाही.
ठेकेदाराने या सर्व अधिकाऱ्यांची मोठ्या हॉटेलात बडदास्त ठेवली होती, त्यांनी कोणतेही आक्षेप घेतले नाहीत, त्यामुळेच हा मोठा गैरव्यवहार झाला आहे. याची निप:क्षपणे चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी शेटे यांनी केली आहे.



लक्ष घालताच कंटेनर वाटले
भूपाल शेटे यांनी या प्रकरणात लक्ष घालताच अधिकाऱ्यांमध्ये गडबड सुरू झाली. कोणतीही अधिकृत माहिती देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले तसेच कराराप्रमाणे पुरवठा झाला का हे पाहण्याची जबाबदारी असतानाही अधिकाऱ्यांनी तसे न करता ३०० पैकी २६० कंटेनर प्रभागात वाटून टाकले. सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी ४० कंटेनर वर्कशॉपमध्ये शिल्लक ठेवले. त्याची बुधवारी तपासणी केली असता हा घोटाळा उघडकीस आला. शिल्लक कंटेनर ठेकेदारास परत करावेत, अशी मागणी शेटे यांनी केली.
आयुक्तांचा एवढा वचक असूनही कंटेनर घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात अधिकाऱ्यांची एक मोठी साखळी असल्याचा आरोप शेटे यांनी केला. निविदा मंजूर करण्यापासून ते अंतिम बिल देण्यापर्यंतचे सर्व अधिकारी या प्रकरणात अडकले आहेत. निविदा उघडल्यावर आधी सुशीलानंद इक्विपमेंटस् (कागल एमआयडीसी) यांना कंटेनर पुरवठ्याचे काम दिले, पण दोन दिवसांनी हेच काम तिरूपती एंटरप्रायजेस यांना दिल्याचे शेटे यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांवरसुद्धा आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे, असे शेटे म्हणाले.

Web Title: Buy 'Container'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.