‘सावित्रीबाई फुले’त तात्काळ फोटोथेरपी युनिट खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:53+5:302021-01-13T04:58:53+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये काही महत्त्वाची यंत्रसामग्री मुदत संपल्याने बंद आहेत, तर काही मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. ...
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये काही महत्त्वाची यंत्रसामग्री मुदत संपल्याने बंद आहेत, तर काही मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णायाकडे जावे लागते. ही यंत्रसामग्री खरेदी करण्याची मागणी द नेशन फर्स्ट या सामाजिक संस्थेकडून महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. विशेष म्हणजे बाल विभागात फोटोथेरपी युनिट तात्काळ घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील सरकारी रुग्णालयातील बाल विभाग पुन्हा चर्चेत आले आहेत. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयामधील बाल विभागात फोटोथेरपी युनिटकडील एकूण १० मशिनरीपैकी ४ मशिनरींची मुदत संपली असून बंद आहेत. तर ६ मशिनरींचीही मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. खासगी रुग्णालयात यासाठी ५ हजार रुपये खर्च करावे लागतात. सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये माफक दरात सेवा दिली जाते. या मशिनरी तातडीने खरेदी करण्याची मागणी द नेशन फर्स्टने केली.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आर्थोपेडिक शस्त्रक्रिया सध्या बंद आहेत. इन्प्लांट पुरवठा करणाऱ्यांनी पुरवठा करणे बंद केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. इतर पुरवठादाराकडून याची खरेदी करून आर्थोपेडिक शस्त्रक्रिया सुरू कराव्यात. तज्ज्ञांची नेमणूक करून डायलेसिस विभाग सुरू करावीत, लॅमिनार एअरफ्लो मशीन खरेदी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
चौकट
महात्मा जोतिबा फुले योजनेतून सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या खात्यावर ११ लाख रुपये जमा आहेत. तसेच इतरही २० लाख रुपये आहेत. ही रक्कम नियमानुसार रुग्णालयासाठीच खर्च करायची असून यातून गरजेची यंत्रसामग्री खरेदी करण्याची मागणीही केली आहे.
फोटो : १००१२०२१ केएमसी हॉस्पिटल न्यूज
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये अत्यंत गरजेची असणारी यंत्रसामग्री घेण्याची मागणी द नेशन फर्स्टच्या वतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.