एलईडी खरेदीत भ्रष्टाचार
By Admin | Published: June 28, 2016 11:51 PM2016-06-28T23:51:28+5:302016-06-29T00:05:40+5:30
दिलीप टिपुगडे यांचा आरोप : करवीर पंचायत समिती सभा
कसबा बावडा : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये एलईडी बल्ब खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी करावी, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. अध्यक्षस्थानी सभापती स्मिता गवळी होत्या. सभेत पशुसंवर्धन, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाला चांगलेच फैलावर घेण्यात आले.
शासनाचे अनुदान आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे आपल्या मर्जीनुसार ते वाटेल तशी खरेदी करत आहेत. रस्त्यावर लावावयाचे ३० वॅटचे एलईडी बल्ब काही ग्रामपंचायतींनी मात्र १८०० ते २००० रुपयांना खरेदी केले असतानाच काही ग्रामपंचायतींनी मात्र हेच बल्ब ५ हजार ६०० रुपयांना खरेदी केले आहेत. या प्रक्रियेत ग्रामसेवकांचा हात आहे. ४३ ग्रामपंचायतींमध्ये असा प्रकार घडल्याचे टिपुगडे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर तानाजी आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी, यांनी कारवाईची मागणी केली. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी महिन्यात या प्रकाराची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
‘ज्ञानरचनावादी अध्ययन’ व ‘आनंददायी एरोबिक्स’ या पंचायतच्या शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या ठरावाला सदस्यांनी संमती दिली. या उपक्रमाची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार व गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी दिली. माध्यमिक शाळा समितीमध्ये कोणत्याही निर्णय प्रक्रियेत पंचायत सदस्यांना विचारात घेतले जात नसल्याची तक्रार भुजगोंडा पाटील यांनी केली. यावर माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी पंचायत सदस्य स्थानिक शाळेवर आपला अंकुश ठेवू शकतात, असा खुलासा केला. सचिन पाटील यांनी बाहेरील तालुक्यांतून आलेल्या; परंतु तक्रार असलेल्या शिक्षकांची नेमणूक करवीर तालुक्यात करू नये, अशी सूचना केली.
जनावरांना गोकुळ दूध संघामार्फत लसीकरण कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची औषधे खरेदी न करता अन्य इतर औषधे खरेदी करावीत, अशी मागणी सभागृहात केली.
अपंगांसाठीचा तीन टक्के निधी ग्रामपंचायतींनी खर्च न केल्याचा आरोप तानाजी आंग्रे यांनी केला. घरकुल योजनेतून ९३ ठिकाणी घरे बांधली आहेत. परंतु, पहिले दोनच हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. राहिलेला हप्ता त्यांना न देता त्यांची घरेच बेकायदेशीर असल्याच्या नोटिसा पाठविल्याची तक्रार सरदार मिसाळ व जयसिंग काशीद यांनी केली. याची चौकशी करण्याच्या सूचना उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी केल्या.
करवीर पंचायत समितीच्या जागेसंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती सभापती स्मिता गवळी यांनी सभागृहाला दिली. उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी या जागेवर कूळ म्हणून करवीर पंचायतचे नाव लागल्याचे सांगितले. या जागेसंदर्भात न्यायालयात दावा सुरू असल्याची माहिती दिली. दिलीप टिपुगडे यांनी सध्या आहे त्या ठिकाणी करवीर पंचायतची इमारत लगेचच होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.
नंबर प्लेटवर महाराष्ट्र शासन
गांधीनगरचे ग्रामसेवक वळवी यांच्या कारभाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी केली. वळवींनी नंबर प्लेटवर महाराष्ट्र शासन असे लिहिले आहे. त्यांना असे लिहिण्याचा अधिकार आहे का? असा सवालही टिपुगडे यांनी केला. नदीकाठच्या मोटार दुरुस्तीवर एक लाख रुपयांचा वळवींनी खर्च टाकला असल्याचे टिपुगडे म्हणाले.