आॅनलाईनने खरेदी करताय? सावधान...! स्वस्त वस्तूंच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:40 AM2019-11-22T11:40:15+5:302019-11-22T11:42:31+5:30
विनोद सावंत कोल्हापूर : स्वस्तात वस्तू मिळत असल्यामुळे सर्रास आता आॅनलाईनने खरेदी केली जात आहे. मात्र, आॅनलाईन खरेदीच्या बहाण्याने ...
विनोद सावंत
कोल्हापूर : स्वस्तात वस्तू मिळत असल्यामुळे सर्रास आता आॅनलाईनने खरेदी केली जात आहे. मात्र, आॅनलाईन खरेदीच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळीच सक्रिय झाली आहे. त्यांच्याकडून नामवंत कंपनीच्या नावाचा गैरवापरही सुरू आहे. त्यांच्या स्वस्त वस्तू देण्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडत आहेत. अशा गंडा घालणाऱ्या टोळीपासून सावधान रहा; के्रडिट कार्ड, एटीएमचे पासवर्ड, ओटीपी नंबर सांगू नका, असे आवाहन बँका, सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
‘हॅलो, बँकेतून बोलतो आहे...’ असे सांगून एटीएमचा पासवर्ड घेऊन लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार वाढत असताना आता आॅनलाईनने खरेदी करणाऱ्यांचे ओटीपी नंबर घेऊन फसवणुकीचे प्रकारही वाढतच आहेत. त्यामुळे बँका आणि सायबर सेलसमोर आॅनलाईनवरून होणारी फसवणूक ही आव्हान ठरत आहे.
बँकांकडून ग्राहकांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या जात आहेत. जलद गतीने घरबसल्या बँकिंग सेवा मिळण्यासाठी आॅनलाईन बँकिंग सुरू केले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा जसा फायदा होतो तसे तोटेही होतात, याची अनेक उदाहरणे आहेत. त्याला आॅनलाईन बँकिंगही अपवाद नाही. या सेवांचा वापर सतर्कतेने केला नसल्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. नाशिकमध्ये एका नामवंत सहकारी बँकेतील ३४ ग्राहकांच्या के्रडिट कार्डचा ओटीपी नंबर घेऊन १६ लाखांचा गंडा घातल्याची ताजी घटना आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आॅनलाईनने खरेदी करणाºयांच्या फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे.
बँकांनी आवाहन करूनही फसवणूक
बँकेच्या वतीने ग्राहकांना फोन करून पासवर्ड अथवा ओटीपी नंबरची माहिती घेतली जात नाही, अशा आशयाचे संदेश मोबाईलवर दर आठ दिवसांनी बँका देत आहेत. तरीही काही ग्राहक गंडा घालणाºयाच्या गोड बोलण्यास फसत आहेत. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या सायबर क्राइमचा रेशो वाढत आहे. ओटीपी सांगितल्याने खात्यावरील रक्कम काढल्यानंतर बँकाही काहीही करू शकत नाहीत. ग्राहकांवर पश्चात्ताप करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय समोर राहत नाही.
बोगस आर्मी जवानांपासून सावधान
जुन्या वस्तू खरेदी-विक्री करणारी एक नामवंत आॅनलाईन कंपनी आहे. या कंपनीचा गैरफायदा घेऊन गंडा घालणारी टोळीच सक्रिय झाली आहे. या टोळीच्या जाळ्यात अनेकजण सापडत आहेत. ग्राहकांची सहानुभूती मिळविण्यासाठी ते आर्मी जवान असल्याचे सांगून वाहन अथवा वस्तूविक्रीच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालत आहेत. त्यांच्याकडून बोगस आयकार्ड आॅनलाईनवर टाकले जाते. त्याला अनेकजण फसले जात असल्याची माहिती सायबर सेलकडून देण्यात आली आहे.
स्वस्त वस्तूंच्या आमिषाला बळी पडू नका
सायबर क्राइमला आळा बसण्यासाठी ग्राहकांची सतर्कता महत्त्वाची आहे. विश्वसनीय कंपनी असल्याची खात्री करूनच आॅनलाईनने खरेदी करावी. वस्तू घरात पोहोच झाल्यानंतरच पैसे द्यावेत. स्वस्त वस्तू देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. उत्पादनखर्चापेक्षा कमी दरात कोणतीही कंपनी वस्तू देऊ शकत नाही. ‘स्वस्त वस्तू म्हणजे धोका,’ हे ओळखले पाहिजे. संबंधिताने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करू नये. ओटीपी नंबर देऊ नये.
- मंगेश देसाई
साहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर