बावडा ‘एसटीपी’चा आज फैसला होणार
By admin | Published: February 12, 2015 12:09 AM2015-02-12T00:09:33+5:302015-02-12T00:22:05+5:30
पंचगंगा प्रदूषण : जयंती नाला नदीत सोडण्याबाबत होणार बैठक; नाला सोडण्याशिवाय गत्यंतर नाही : महापालिका
कोल्हापूर : कसबा बावडा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. एसटीपी १०० टक्के बंद ठेवून रखडलेल्या ३०० मीटरच्या कामासाठी किमान पंधरा दिवस उपसा बंद करून जयंती नाला नदीत सोडणे गरजेचे आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज, गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, पंचगंगा प्रदूषण प्रश्नी याचिकाकर्ते, आदी सर्वांची बैठक बोलावली आहे. जयंती नाला पंचगंगेत सोडल्याखेरीज एसटीपी सुरू होणे अशक्य असल्याने यावर एकमत होण्याची शक्यता आहे.
कसबा बावड्यातील ७६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया क रणारे ७५ कोटींच्या एसटीपी केंद्राचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. न्यायालयाने गेल्या दीड वर्षात चार वेळा ‘डेडलाईन’ दिली. न्यायालयाने दिलेली ३१ जानेवारी २०१५ ची अंतिम मुदतही संपली. यानंतर पंचनामा करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट आयुक्तांना नोटीस पाठविली. मात्र, केंद्र पूर्ण क्षमतेने सुरूच होऊ शकले नाही. ‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तर संपूर्णपणे खासगी शेतातून जाते. त्यामुळे सुरुवातीस या पाईपलाईनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता. पाईपलाईनला विरोध करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जुना व नवा असे दोन्ही एसटीपी प्रकल्प पूर्णपणे बंद करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)