SSC Result: माळीकाम करून 'ओंकार'ने फुलविला यशाचा मळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:09 PM2022-06-18T13:09:48+5:302022-06-18T13:10:08+5:30
निकाल लागल्यावर अनेक मुले जल्लोष साजरा करत असताना, ओंकार मात्र वडिलांच्या बरोबर सायकलवरून माळीकाम करण्यासाठी गेला होता.
कोल्हापूर : कोल्हापुरात अनेकांच्या दारातील बाग फुलविणाऱ्या बबन धोंडिराम जानकर (रा. महालक्ष्मीनगर कदमवाडी) यांचा मुलगा ओंकारने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यशाचे मळे फुलवले. त्याला ९०.८० टक्के गुण मिळाले.
निकाल लागल्यावर अनेक मुले जल्लोष साजरा करत असताना, ओंकार मात्र वडिलांच्या बरोबर सायकलवरून माळीकाम करण्यासाठी गेला होता. त्याला इंजिनिअरिंग करून भवितव्य घडवायचे आहे. त्याच्या यशाने जानकर कुुटुंबात शुक्रवारी आनंदाचे भरते आले.
बागकाम करून चालवतात संसार
जानकर मूळचे साळवणचे. सामान्य धनगर समाजातील. या कुटुंबात अक्षरओळख नाहीच. वडिलांच्या नशिबानेही शाळेचा दरवाजा कधी उघडला नाही. आई रंजना मात्र कशीबशी सातवीपर्यंत शिकलेली. गावाकडे पोटापाण्याची अडचण म्हणून ते नोकरीच्या शोधात कोल्हापुरात आले. बागकामाची आवड असल्याने घरोघरी जाऊन बागकाम करून ते संसार चालवतात.
..मुलाने कष्टाचे चीज केले
ओंकार हा भोसलेवाडीतील सुसंस्कार विद्यालयाचा विद्यार्थी. तेथील सर्व शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केल्याचे ओंकारने सांगितले. कोणताही खासगी क्लास नाही, की घरीही अभ्यास घेणारे कुणी नाही. परंतु त्याच्यात उपजतच हुशारी असल्याने त्याने हे यश मिळविले. वडिलांना शिकता आले नाही, परंतु त्यांनी दोन्ही मुलींनाही चांगले शिक्षण दिले आहे. आमचे आयुष्य मातीत गेले, परंतु मुलाने चांगले यश मिळवून, घेतलेल्या कष्टाचे चीज केले, याचा आनंद मोठा असल्याची भावना जानकर पती-पत्नीने व्यक्त केली.