दामदुप्पटचा भूलभुलैया अन् गुंतवणूकदारांना दुबईची टूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:25 AM2022-05-28T11:25:48+5:302022-05-28T11:27:34+5:30
आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुमच्या पैशाचा कमी कालावधीत दुप्पट मोबदला देतो, असे आमिष दाखवून २,४६० गुंतवणूकदारांना चक्क दुबईची हवाई सफर घडवून आणली
कोल्हापूर : आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुमच्या पैशाचा कमी कालावधीत दुप्पट मोबदला देतो, असे आमिष दाखवून गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या दोन कंपन्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा व बेळगाव जिल्ह्यातील २,४६० गुंतवणूकदारांना चक्क दुबईची हवाई सफर घडवून आणली आहे. त्यामुळे गावोगावी व पै-पाहुण्यांत दुबईचीच चर्चा जोरात सुुरू आहे. अनेकांनी मोबाइल स्टेटसला दुबईचे फोटो लावले आहेत. दोन कंपन्यांच्या वतीने त्यांना नेण्यात आले असून, सर्व खर्च कंपनीमार्फत करण्यात येत आहे.
या दोन्ही कंपन्यांच्या वतीने दुबईतील जंगी कार्यक्रमात क्रिप्टो करन्सीचे कॉइन बाजारात आणण्यात येणार आहे. त्याचा अनावरण सोहळा ‘याचि देही... याचि डोळा’ पाहण्यासाठी म्हणून या गुंतवणूकदारांना तिकडे नेण्यात आले आहे. त्यासाठी कोल्हापुरातीलच एका पर्यटन कंपनीने विमानाचे बुकिंग केले आहे. २४ मेपासून रोज फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती, त्यातील शेवटची फ्लाइट शुक्रवारी मुंबईतून रवाना झाली.
देशातील नामांकित पर्यटन कंपन्यांकडूनही एकाच देशासाठी एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने आतापर्यंत कधीच फ्लाइटचे बुकिंग झालेले नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. तो उच्चांकही या कंपन्यांनी मागे टाकला. या कंपन्यांनी एका गुंतवणूकदारावर या सहलीसाठी किमान ५० हजार रुपये खर्च केले आहेत. हीच रक्कम बारा कोटींहून जास्त होते.
क्रिप्टोचा अनुभव...
काही महिन्यांपूर्वी यातील एका कंपनीबद्दल थेट ‘सेबी’नेच वृत्तपत्रातून स्पष्टीकरण केले होते. या कंपनीची सेबीकडे कोणतेही नोंदणी नसल्याचे त्यात म्हटले होते. सध्या भारत सरकारनेच अजून क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. त्यामुळे बँकांनाही त्याचे रोखतेत रुपांतर करू नये, असे बजावले आहे. जगभरात क्रिप्टो करन्सीचा अनुभव चांगला नाही. अशास्थितीत या कंपन्या क्रिप्टो करन्सीमध्ये उतरत असल्याचे सांगतात; परंतु प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार साखळी पद्धतीने गुंतवणूक (एलएमएल) अशाच स्वरूपाचा आहे. पुढच्याचे पैसे घेऊन मागच्याला लाभ देणे, असे त्याचे स्वरूप आहे.