Kolhapur: ..तोपर्यंत भाजपाचे काम करणे पुर्ण बंद, आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही कार्यकर्त्यांचा उद्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:52 IST2023-09-19T15:49:52+5:302023-09-19T15:52:18+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत कामबंद ठेवण्याचा निर्णय भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. ...

Kolhapur: ..तोपर्यंत भाजपाचे काम करणे पुर्ण बंद, आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही कार्यकर्त्यांचा उद्रेक
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत कामबंद ठेवण्याचा निर्णय भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही नव्या पदाधिकारी निवडीबद्दल उद्रेक समोर आला. येथील मल्हार हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद झाली.
माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे म्हणाले, पक्षासाठी त्याग केला. संघटना उभी केली. परंतु, नव्याने आलेल्यांना पदे देण्यात आली. हे योग्य नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही जुन्या कार्यकर्त्यांची फरफट होत आहे.माजी तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी म्हणाले, ३२ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले. यापुढेही काम करत राहू. निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे, नव्या नियुक्त्या मान्य नाहीत.
माजी शहराध्यक्ष रमेश रिंगणे म्हणाले, मर्जीतील लोकांना खिरापतीसारखे पदे वाटण्यात आली आहेत. निष्ठावंतावर अन्याय झाल्यामुळेच तालुक्यातील भाजपाची स्थिती वाईट आहे. तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत म्हणाले, मर्जीतील लोकांनाच पदे देऊन पक्षाची घटना मोडीत काढण्यात आली. माजी शहराध्यक्ष आनंद पेडणेकर म्हणाले, नव्या निवडी घटनाबाह्य आहेत. आजपर्यंत असे कधीच घडले नाही.
विस्तारक संदीप नाथबुवा म्हणाले, व्यक्तीपेक्षा पक्षच श्रेष्ठ आहे. अंतर्गत कुरघोडी थांबली नाही तर संघटनेला धोका आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवल्या जातील. यावेळी विठ्ठल भमानगोळ, अनिल गायकवाड, बी. एस. पाटील, अजित जामदार, संदीप कुरळे, पुंडलिक कुराडे आदींसह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.