बायपास नावाला... टोलची घाई कशाला!
By admin | Published: April 1, 2016 01:13 AM2016-04-01T01:13:57+5:302016-04-01T01:27:55+5:30
सांगली-कोल्हापूर मार्ग : तमदलगे-अंकली रस्त्यात अडथळे
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या कामात सुप्रीम कन्स्ट्रक्शनकडून होत असलेली दिरंगाई त्यात टोल सुरू करण्याची घाई, त्यामुळे वाहनधारकांच्या नाकी दम आला असून, तमदलगे-अंकली बायपास रस्त्याची कामे अपूर्ण आहेत़ उदगाव येथील बायपास नवीन मार्गाची अवस्थादेखील तशीच आहे़ हा रस्ता कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनधारकांतून होत आहे़
महामार्गावरील तमदलगे ते जैनापूर मार्ग या बायपास रस्त्याचे काम सध्या अपूर्णच आहे़ रेल्वे स्थानक ते अंकली टोल नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही़ या मार्गाला सध्याच्या रस्त्याला बाह्यवळण असल्याने हे बाह्यवळण दूर करून नवीन जागा हस्तांतर करण्यात आली आहे. तसेच उदगाव येथील ओढ्यावरील पूल बांधण्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे़ मात्र, या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, फक्त मुरुमीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ चौपदरीकरणाच्या कामात तमदलगे ते अंकली तसेच तमदलगे ते जयसिंगपूर, उदगाव मार्गावरील अपूर्ण कामांमुळे या भागातील नागरिकांना एक प्रकारची शिक्षाच, अशी परिस्थिती असताना या भागातील नागरिकांवर अन्याय करणारा टोल नाका अंकली येथे होणार असल्यानेच त्याला विरोध होत आहे़ सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्ता होण्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर या महामार्गाला मंजुरी मिळाली होती. पाच वर्षांपासून रस्त्याच्या कामाला विलंब झाला आहे़ टोलविरोधी कृती समितीने टोलला टोला देण्यासाठी चंग बांधला आहे. येणाऱ्या काळात टप्प्याटप्याने आंदोलन केले जाणार आहे.
असून अडचण नसून खोळंबा
तमदलगे बसवान खिंडीपासून अंकली टोल नाक्यापर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे़ निमशिरगाव-जैनापूर येथे सुमारे दीड किलोमीटर रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे़
तमदलगे येथे घरे व मंदिराचा प्रश्नही ‘जैसे-थे’ आहे़ यामुळे हा बायपास रस्ता ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे असताना टोल कशासाठी द्यायचा, असा सवाल नागरिकांतून होत आहे़