‘ट्राय’च्या बदललेल्या नियमामुळे केबलचालकांचे मोडले कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 02:57 PM2019-11-27T14:57:14+5:302019-11-27T14:59:29+5:30
‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी याकडे
विनोद सावंत
कोल्हापूर : ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया)ने पसंतीनुसार चॅनेल निवड करण्याचा नियम केला. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन नियमाचा सर्वाधिक फटका केबलचालकांना बसला असून, त्यांचे कंबरडे मोडले आहे. नियमानंतर दहा महिने होत आले तरी जिल्ह्यातील २० टक्के ग्राहकांनी केबल कनेक्शन घेतलेली नाहीत. पूर्वीपेक्षा फायदा कमी झाल्याने केबलचालकांना देखभाल खर्च करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली. पूर्वी सुमारे १५० ते २०० रुपयांत मिळणाऱ्या चॅनेलसाठी आता २५० ते ३०० रुपये खर्च करावा लागत असल्यामुळे अनेकांनी केबल कनेक्शन पुन्हा सुरू केलीच नाहीत, हे वास्तव आहे.
- जिल्ह्यातील केबल ग्राहक - सुमारे ४ लाख
शहरातील केबल ग्राहक - ८० हजार
केबल आॅपरेटर - १३००
- पसंतीनुसार चॅनेल निवडीच्या नियमाला दहा महिने होत आले तरी २० टक्के ग्राहकांनी केबल कनेक्शन सुरू केलेली नाहीत. जिल्ह्यात सुमारे ८० हजार ग्राहकांचा यामध्ये समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचा फटका केबलचालकांसह सिस्टीमचालकांनाही बसत आहे.
- यशोराज पाटील, जनरल मॅनेजर, बी टीव्ही
फायदा ३५ टक्के झाला कमी
एका ग्राहकामागे यापूर्वी १४० रुपयांचा फायदा मिळत होता. नवीन नियमामुळे हा फायदा ९० रुपयांवर आला आहे. चॅनेलने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा पैसे घेता येत नाहीत. त्यामुळे ३५ टक्के फायदा कमी झाला आहे. याचा परिणाम देखभाल खर्चावर होत आहे. कामगार पगार, केबल वायर, अॅम्प्लिफायर खराब झाल्यास दुरुस्तीचा खर्च हे सर्व हाताबाहेर गेले आहे.
- संतोष पाटील, जरगनगर-रामानंदनगर केबलचालक
महापुराचाही फटका
ग्रामीण भागातील ग्राहक शेतीतील कामे झाल्यानंतर जूनमध्ये कनेक्शन पुन्हा सुरू करतील, अशी अपेक्षा केबलचालकांना होती. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका जसा इतर व्यवसायांना बसला, तसा केबल व्यवसायाला बसला. महापुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे जूननंतरही केबल कनेक्शन घेण्यास अनेकांनी पाठ फिरविली.