'कॅग'च्या दणक्याने बोगस बांधकाम कामगार होणार उघड, बांधकाम व्यवसायात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:53 AM2022-12-09T11:53:35+5:302022-12-09T11:53:55+5:30
कोल्हापूर जिल्हयात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली
कोल्हापूर : शहर आणि जिल्हयात मोठ्या संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची चौकशी कॅग संस्थेकडून (महालेखापरीक्षक) होत असल्याने बांधकाम व्यवसायातही खळबळ उडाली. यातून बोगस कामगार उघड होणार आहेत. परिणामी गावा गावात बोगस बांधकाम कामगार कोण ? यासंबंधी चर्चा रंगली आहे.
जिल्हयात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करता येते. यासाठी बांधकाम कामगार असल्याचा ग्रामसेवक किंवा बांधकाम अभियंत्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. हे दाखले मिळवून बांधकाम कामगार नसलेल्या अनेकजणांनी नोंदणी केल्याचा संशय कॅगला आला आहे.
खोट्या बांधकाम कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आणि खरे वंचित राहिले असाही प्रकार काही ठिकाणी झाला आहे. यासंबंधीचा संशय आल्याने गेल्या आठ दिवसांपासून कॅगकडून बांधकाम कामगार नोंदणीची सखोल चौकशी केली जात आहे. यासाठी मुंबईहून आलेले पथक येथे तळ ठाेकून आहे. पहिल्या टप्यात पथकाने जिल्हयातील बांधकाम कामगारांना कोणत्या योजनांचा लाभ मिळाला, कोणत्या गावातील कामगारांना मिळाला याची माहिती घेतली.
आता सर्वाधिक दाखले दिलेल्या बांधकाम अभियंत्यांना बोलवून चौकशी केली जात आहे. ही चौकशी एकेका अभियंत्यास बोलवून करण्यात येत आहे. गोपनीय असल्याने यासंबंधीची अधिकृत माहिती बाहेर पडलेली नाही. पण चौकशीसाठी बोलवलेले अभियंते आपल्या कोणते प्रश्न चौकशी अधिकाऱ्याने विचारले प्रश्नांची माहिती बांधकाम कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत. ज्या संघटनांचे बांधकाम कामगार बोगस नोंदणीच्या रॅकेटमध्ये आहेत, ते आता त्यांच्या बचावासाठी पळापळ करत आहेत.
बांधकाम कामगारांना ५० पेक्षा अधिक दाखले दिलेल्या अभियंत्यांची सखोल चौकशी करावी. दोषी आढळल्यास कारवाई व्हावी. चौकशी पथकाने बोगस बांधकाम कामगारांची संख्या उघड करावी. त्यांची नोंदणी रद्द करून त्यांच्याकडून शासनाचा लाभ वसूल करावा. - शिवाजी मगदूम, सचिव, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर..