चल गं सये वारुळाला... कोल्हापुरात नागपंचमी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 08:56 PM2017-07-27T20:56:26+5:302017-07-27T20:57:23+5:30
आदित्य वेल्हाळ कोल्हापूर, दि. 27 - घरोघरी मातीच्या नागमूर्तींची प्रतिष्ठापना, लाह्या, कडबोळ्यांचा नैवेद्य, मंदिरांमध्ये पंचामृत, आरती, प्रसाद वाटप, भजन-कीर्तन ...
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर, दि. 27 - घरोघरी मातीच्या नागमूर्तींची प्रतिष्ठापना, लाह्या, कडबोळ्यांचा नैवेद्य, मंदिरांमध्ये पंचामृत, आरती, प्रसाद वाटप, भजन-कीर्तन अशा उत्साही वातावरणात गुरुवारी नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त कोल्हापुरातील नागाळा पार्कातील तसेच फुलेवाडी रिंग रोड येथील नागोबा मंदिरात विशेष पूजाअर्चा करण्यात आली; तर सांगवडे (ता. करवीर) सारख्या ग्रामीण भागातील महिलांनी प्रत्यक्ष नागाची पूजा केली.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून महिलांचे आवडते सण सुरू होतात. यानिमित्त घरोघरी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या नागमूर्तीची पूजा करून कडबोळ्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. नागाळा पार्कमधील नागोबा मंदिरात महाप्रसाद, वृक्षारोपण, परिसर सौंदर्यीकरण व बालोद्यानाचे उद्घाटन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर हसिना फरास उपस्थित होत्या. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट म्हणून टाकाऊ पदार्थ व वस्तूंमधून साकारलेले बालोद्यान सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. होळकर सामाजिक संस्थेने रोपवाटपाचा उपक्रम राबविला. उपमहापौर अर्जुन माने यांनी उत्सवाचे नियोजन केले. यावेळी आनंद माने, दिलीप मोहिते, नगरसेवक दिलीप पोवार उपस्थित होते.
फुलेवाडी रिंग रोडवरील जिल्हा परिषद कॉलनी येथे साकारण्यात आलेल्या हेमाडपंथी नागोबा मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून मडके फोडणे, झिम्मा-फुगडी यासारख्या खेळांचा आनंद लुटला. महापालिकेच्या कर्मचा-यांनीही महापौरांच्या हस्ते दूधवाटपाचा उपक्रम आयोजित केला. यावेळी शंकर तावडे, अरुण जमादार, रवी पोवार, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, विजय वणकुद्रे, अजित तिवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फुलेवाडी रिंग रोड येथील कर्मवीर स्कूलमध्ये विविध जातींच्या विषारी व बिनविषारी सर्पांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सापांविषयी व प्राथमिक उपचारासंबंधी माहिती देण्यात आली. तसेच सर्पांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. स्वाती डावरे, सुलोचना दिवटे, लता नायर, संगीत भांबे, अश्विनी पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचाºयांनी संयोजन केले.
झोक्यांचा आनंद दुर्मीळ...
या सणापासून महिलांचे पारंपरिक खेळ सुरू होतात. नागपंचमीला झाडाला दोरीचा झोका बांधून महिला व मुली उंचच उंच झोके घेत या खेळाचा आनंद लुटतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातून असे झोकेच गायब झाले आहेत. ग्रामीण भागांतही मोजक्याच ठिकाणी झोके बांधले जातात. ही बाब ओळखून नागाळा पार्कातील नागोबा मंदिराच्या परिसरात झोका बांधण्यात आला होता. सांगवडे येथेही महिलांनी झोक्याचा आनंद घेतला.