कळंबा, येरवडा कारागृहात पडणार- खितपत बिष्णोई गँगला मोक्का : राजस्थानमध्ये गँगवर ४८ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:48 AM2020-02-01T10:48:10+5:302020-02-01T11:27:46+5:30
एकनाथ पाटील कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सामूहिक अत्याचार, दरोडा यांसारखे ४८ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजस्थानमधील बिष्णोई ...
एकनाथ पाटील
कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सामूहिक अत्याचार, दरोडा यांसारखे ४८ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजस्थानमधील बिष्णोई गँगवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले. परिणामी, राजस्थानमध्ये स्वत:ला शेर समजू पाहणाऱ्या बिष्णोई गँगला आता कळंबा व येरवडा कारागृहात खितपत पडावे लागणार आहे.
पुणे-बंगलोर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर पोलिसांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या राजस्थानमधील बिष्णोई गँगचा म्होरक्या शामलाल गोवर्धनराम पुनिया ऊर्फ बिष्णोई (वय २४, रा. भोजासर, जि. जोधपूर) याच्यासह श्रवणकुमार मनोहरलाल मांजू ऊर्फ बिष्णोई (२४, रा. विष्णूनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोधपूर), कारचालक श्रीराम पांचाराम बिष्णोई (२३, रा. बेटलाईन, जोधपूर) यांच्यासह १९ गुन्हेगारांचा मोक्का कारवाईत सहभाग असणार आहे. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव दाखल केला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळाल्यानंतर मोक्काअंतर्गत तपासाला सुरुवात होणार आहे. बिष्णोई गँगवर राजस्थानमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सामूहिक अत्याचार, दरोडा यासारखे ४८ गंभीर गुन्हे दाखल असले, तरी कोल्हापूर पोलिसांवर केलेला गोळीबार चांगलाच महागात पडला आहे. ही गँग मोक्का कारवाईत कळंबा आणि येरवडा कारागृहांत खितपत पडणार आहे. कोल्हापूर पोलिसांच्या कारवाईची गुन्हेगारी जगतामध्ये चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा आहे.
पुणे, नाशिक कनेक्शन
बिष्णोई गँगचा साथीदार श्रीराम बिष्णोई याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. राजस्थान पोलीस मागावर लागल्याने त्यांनी हुबळीमध्ये मुक्काम बसविला होता. याठिकाणी पोलीस पोहोचल्याने ते पुण्याचे दिशेने पळून चालले होते. त्यांचे महाराष्ट्रात कोणाशी साटेलोटे आहे, याबाबत माहिती घेतली असता, पुणे आणि नाशिक येथील काही बिष्णोई लोकांशी कनेक्शन असल्याचे तपासात पुढे आले आहे. हुबळी, पुणे आणि नाशिक याठिकाणी गॅस एजन्सी, तसेच गॅस शेगडी व मटेरियल विक्रीची दुकाने आहेत. हे दुकानदार या गँगच्या संपर्कात असून, ड्रग्सच्या तस्करीसाठी त्यांचा वापर होत असल्याचेही पुढे आले आहे. त्यानुसार संबंधितांकडे चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
श्रवणकुमारला डिस्चार्ज
श्रवणकुमार बिष्णोई याची प्रकृत्ती ठीक झाली आहे. शुक्रवारी रात्री सीपीआरमधून त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर वडगाव पोलीस त्याचा ताबा घेऊन आज, शनिवारी न्यायालयात हजर करणार आहेत. शामलालच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या असल्या तरी त्याच्या प्रकृ तीत सुधारणा होत आहे. त्याला दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. श्रीराम बिष्णोई हा वडगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्या चौकशीमध्ये बिष्णोई गँगच्या कारनाम्यांची माहिती पुढे येत आहे.
राजस्थानचे पथक तळ ठोकून
राजस्थान पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे अधिकारी नरेंद्र पुनिया, उपनिरीक्षक हरिसिंह राजपुरोहित, श्रवणकुमार, देवाराम बिष्णोई, मोहन राय, शेवान राय हे पथक गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहे. या पथकाकडून गुन्हेगारांकडे चौकशी केली जात आहे. कोल्हापूर पोलीस त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत.
पोलिसांची साथ...
कोल्हापूर पोलिसांच्या चकमकीत जखमी झालेला राजस्थानमधील बिष्णोई गँगचा म्होरक्या शामलाल पुनिया ऊर्फ बिष्णोई याच्यासह श्रवणकुमार मांजू ऊर्फ बिष्णोई हे सीपीआर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची चौकशी करतानाचे व पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात असलेला श्रीराम बिष्णोई याच्यासोबत उभे असतानाचे राजस्थान पोलिसांचे फोटो बिष्णोई गँगच्या फेसबुक अकौंटवर पडले आहेत. या गोपनीय चौकशीचे फोटो या गँगकडे पोहोचलेच कसे, हा धक्का कोल्हापूर पोलिसांनाही बसला आहे. राजस्थानमधील पोलिसांकडून हा फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा दिवसभर होती.