पंचगंगा प्रदूषणावरील खर्चाचा हिशेब द्या

By admin | Published: January 20, 2016 01:17 AM2016-01-20T01:17:01+5:302016-01-20T01:19:14+5:30

रामदास कदम यांचे महापालिकेला आदेश

Calculate the cost of Panchanganga pollution | पंचगंगा प्रदूषणावरील खर्चाचा हिशेब द्या

पंचगंगा प्रदूषणावरील खर्चाचा हिशेब द्या

Next

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या वर्षात किती रुपये खर्च केले आणि कोणत्या कामावर खर्च केले, याचा हिशेब सादर करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आयुक्त पी. शिवशंकर, जलअभियंता मनीष पवार, उपजल अभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, आदी उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासनाने प्रदूषण निर्मूलनासाठी सुरू केलेल्या कामांची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दुधाळी सांडपाणी प्रकल्पाचे सुरू असलेले काम यासह शहरातील बारा नाल्यांचे सांडपाणी रोखण्याबाबतच्या नियोजित कामाची माहिती आयुक्तांनी सांगितली. प्रदूषण रोखण्यासंदर्भात पर्यावरणाच्या कामांसाठी महापालिका प्रत्येक वर्षी किती खर्च करते, २०१४-१५ सालात पर्यावरणाच्या कामासाठी किती रकमेची तरतूद केली होती, त्यापैकी किती खर्च केली याची माहिती द्या, अशी मागणी पर्यावरणमंत्री कदम यांनी केली; परंतु यासंदर्भात कोणतीही माहिती अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे मंत्री कदम यांनी ‘माहिती द्या आणि मगच जा,’ असे निर्देश दिले. त्यामुळे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी फोनवरून ही माहिती घेतली आणि नंतर ती सचिवांना दिली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकातील भांडवली खर्चाच्या २५ टक्के रक्कम प्रत्येक वर्षी पर्यावरणविषयक कामांसाठी खर्च केलीच पाहिजे, असा दंडक असून त्याची अंमलबजावणी करा, असे आदेश मंत्री कदम यांनी दिले. महानगरपालिकेने गतवर्षी ३१२ कोटींची तरतूद भांडवली खर्चासाठी केली होती; परंतु महापालिकेला उत्पन्न कमी मिळाल्यामुळे आतापर्यंत भांडवली कामांवर १२३ कोटी खर्च केले असून त्यापैकी २३ कोटी हे पर्यावरणाच्या कामांवर खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी इचलकरंजी नगरपालिका प्रदूषण रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या भुयारी गटार योजनेची माहिती मंत्री कदम यांनी घेतली. (प्रतिनिधी)



मनपाने २५ % रक्कम खर्च केलीच पाहिजे
महापालिकेच्या भांडवली खर्चाच्या २५ टक्के रक्कम ही कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाच्या कामावर खर्च केलीच पाहिजे, अशी समजही मंत्री रामदास कदम यांनी या बैठकीत कोल्हापूर महा-पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली.

Web Title: Calculate the cost of Panchanganga pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.